पुणे : मराठीतूनही आता ‘एआय’ टूल्स वापराचे धडे मिळणार असून, त्यासाठी कोर्सिट या अॅपवर सुमारे शंभर अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘कोर्सिट’चे संस्थापक प्रथमेश सखदेव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अटल इनक्युबेशन सेंटर आणि रयत शिक्षण संस्थेच्या सेंटर फॉर इनव्हेंशन, इनोव्हेशन अँड इनक्युबेशनमध्ये इन्क्युबेटेड असलेल्या क्लिकस्किल्स एडटेक या स्टार्टअपने कौशल्यविकासासाठी कोर्सिट या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्मवर आता मराठीतूनही ‘एआय’ आधारित विविध टूल्स कसे वापरायचे, हे शिकवण्यात येणार असल्याचे सखदेव यांनी सांगितले.
सखदेव म्हणाले, ‘ज्या भाषेत आपण विचार करतो, त्याच भाषेत माहिती तंत्रज्ञान शिकले पाहिजे. या संकल्पनेवर कोर्सिट हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. त्यावर आता ‘एआय’ बरोबरच माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंग या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. मराठीतील अभ्यासक्रमांबरोबरच मार्गदर्शक (मेंटर्स), ई-मेल आणि व्हाटसॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्यावरही भर देत आहोत. ‘एआय’शी संबंधित सुमारे १०० अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यापैकी २५ अभ्यासक्रम सध्या उपलब्ध असून उर्वरित ७५ अभ्यासक्रम या वर्षाअखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. येत्या काळात इतर भारतीय भाषांमध्येही हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’ अधिक माहितीसाठी korsit.in या संकेतस्थाळवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
‘माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग व एआय क्षेत्रातील ज्ञान मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, त्यामुळे मराठी भाषेत अधिक सहजतेने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नव्या कौशल्यांचा शोध घेणाऱ्या व्यावसायिकांना नवीन संकल्पना समजून घेणे, कौशल्ये आत्मसात करणे आणि त्यातून करिअरच्या नव्या संधी मिळविणे आव्हानात्मक ठरू शकते. हीच महत्त्वाची उणीव दूर करण्याचा प्रयत्न कोर्सिटच्या माध्यमातून केला जात आहे,’ असे प्रथमेश यांनी सांगितले.
‘कोर्सिट’ची सुरुवात कशी झाली ?
कराडचे मूळ रहिवासी असलेले प्रथमेश साखदेव यांनी व्हीआयटी, पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एमआयटी, पुणे येथून एमबीए मार्केटिंग पूर्ण केले. ते २०१३ पासून वेबविव्हर लॅब्स ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवत आहेत. वर्ष २०२२ मध्ये त्यांनी क्लिकस्किल्स या उपक्रमावर काम सुरू केले व माहिती तंत्रज्ञान विषयाशी संबंधित १३ अभ्यासक्रम मराठीमध्ये उपलब्ध करून दिले. सुमारे १६००० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा फायदा घेतला. क्लिकस्किल्स याच उपक्रमाचे पुढे कोर्सिट मध्ये रूपांतर करण्यात आले.
