पुणे : गेल्या २५ वर्षांत भारतात ५०७ अब्ज डॉलरची सोन्याची आयात झाली आहे. देशात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा हा आकडा मोठा आहे, अशी माहिती कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी दिली. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या दीडपट मूल्य असलेले सोने तिजोरीत ठेवणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’च्या (एमसीसीआयए) वतीने ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत नीलेश शहा यांनी भारताच्या विकासाची गाथा आणि बदलते जग यावर विचार मांडले. ते म्हणाले, की देशातील सोन्याच्या आयातीवर आपण एकूण ६०० ते ७०० अब्ज डॉलर खर्च केले आहेत. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १५० टक्के मूल्य असलेले सोने आपण तिजोरीत पडून ठेवत आहोत. अशी स्थिती असणारा भारत हा जगात एकमेव देश आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात थेट परकीय गुंतवणुकीचा वाटा केवळ २ टक्के आहे. म्हणजे प्रत्यक्षात तो नगण्य असाच आहे. सोन्याचा साठा हा प्रामुख्याने काळ्या पैशाच्या रूपाने आहे. त्याच वेळी सोन्यातून परतावा चांगला मिळत असल्यानेही गुंतवणूक वाढत आहे. गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करताना काही हिस्सा देशातील सोन्यासारख्या स्वयंउद्योजकांमध्ये गुंतविण्यासाठी ठेवावा.

वाहननिर्मिती क्षेत्रातील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत असून, विविध देशांशी झालेल्या व्यापार करारांचा त्याला फायदा होत आहे. अमेरिका आणि चीनसोबत असलेल्या व्यापाराचा भारताला लाभ मिळत आहे. सिरॅमिक उद्योगाचा विस्तार वेगाने होत असून, या क्षेत्रात समूहविकास आणि नावीन्यतेमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे, असे शहा यांनी नमूद केले.

अवकाश, संरक्षण क्षेत्रात संधी

अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांनी सुटे भाग सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून (एमएसएमई) खरेदी करावेत, यासाठी सरकार आग्रही आहे. यातून एमएसएमईसाठी या क्षेत्रात मोठी मागणी निर्माण झाली असून, त्यांनी या संधीचा योग्य वापर करावा. देशातील एमएसएमई क्षेत्रात ३२ कोटी जणांना रोजगार आहेत. देशातील सकल राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा वाटा ३१ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व विकास आयुक्त डॉ. रजनीश यांनी केले.