पुणे : कोथरूड भागातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेच्या आवरातून विद्यार्थ्याकडील एक लाख ८० हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका महाविद्यालयीन तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण पौड रस्ता परिसरातील एक नामवंत शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी तो महाविद्यालयाच्या आवारात आला. त्याने त्याच्याकडील बॅगेत लॅपटाॅप ठेवला होता. त्याचे लक्ष नसल्याची संधी साधून बॅगेतून लॅपटाॅप चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवराातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस हवालदार दळवी तपास करत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एका सदनिकेतून महाविद्यालयीन तरुणाचा लॅपटाॅप चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण नऱ्हे भागातील एका सोसायटीत राहायला आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटा आत शिरला. चोरट्याने महागडा मोबाइल संच आणि लॅपटाॅप असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पाेलीस हवालदार कदम तपास करत आहेत.
कात्रजमध्ये बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेले
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि कुटुंबीय कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शेलारमळा परिसरा राहायला आहेत. गुरुवारी मध्यरात्री बंगल्याच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला.
महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत. शहर परिसरात चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीचे आवार, बंगले, शासकीय कार्यालये, तसेच शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

