पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील वैकुंठ स्मशानभूमीवर येणारा ताण कमी करण्यासाठी शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये चार ठिकाणी गॅसदाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून, दोन ठिकाणी स्थानिकांचा विरोध आहे. तर, एका ठिकाणी स्थानिकांचा विरोध मावळला आहे. विरोध होत असलेल्या ठिकाणी नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

महापालिकेने स्मशानभूमींचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये ७ गॅसदाहिन्या उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या विद्युत विभागाने घेतला. यामध्ये म्हाळुंगे, महंमदवाडी, येवलेवाडी, उत्तमनगर, खडकवासला, खराडी आणि बाणेर या ठिकाणांचा समावेश होता.

यापैकी महंमदवाडी, खराडी आणि बाणेर येथील कामे पूर्ण झाली असून म्हाळुंगे येथे काम प्रगतिपथावर आहे. येवलेवाडी येथील स्थानिकांचा विरोध आमदारांच्या मध्यस्थीनंतर मावळला. उत्तमनगर आणि खडकवासला येथे मात्र अजूनही नागरिकांचा विरोध कायम आहे. या भागातील नागरिकांना समजावून सांगण्याचे आव्हान महापालिकेतील अधिकाऱ्यांसमोर आहे.

कोथरूड भागात असलेल्या शास्त्रीनगर स्मशानभूमीसाठी महापालिकेने साडेसात कोटींचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील रहिवासी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोथरूड परिसरात स्थायिक झाले आहेत. या भागातील कोणाचा मृत्यू झाल्यास नागरिक अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत जातात.

हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेच्या भवन विभागाच्या वतीने कोथरूड येथील शास्त्रीनगर स्मशानभूमीचा ७.५ कोटी रुपये खर्च करून तेथे पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी ३ लाकडी आणि १ गॅस दाहिनी उभारली जाणार असून, यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवरील भार लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर म्हणाल्या, मध्यवर्ती पेठ भागात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागांत गॅसदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला. चार ठिकाणी काम पूर्ण झाले असून, उर्वरित तीन ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांना विश्वासात घेऊन काम पूर्ण केले जाणार आहे.

मांजरी, धायरी, नांदेड सिटी परिसरात गॅसदाहिनीची मागणी

महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरी, रामटेकडी, नांदेड सिटी, धायरी आणि सुतारवाडी येथील स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी बसवण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. यामध्ये नांदेड सिटी येथील स्मशानभूमीची जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. तर, धायरी येथील स्मशानभूमीत नवीन तंत्रज्ञानयुक्त दाहिनी उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.