पुणे : शहरात कोयता गँगकडून दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन दहशत माजविल्याची घटना कोंढवा भागात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टोळक्याने कोयते उगारुन नागरिकांना धमकावल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा >>> पुणे: राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात करावी; क्रेडाई पुणे मेट्रोची मागणी




या प्रकरणी पोलिसांनी पवन रवींद्र राठोड (वय २३, रा. साईनगर, कोंढवा) याला अटक केली आहे. मंगेश माने याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राेहित खंडाळे (वय २४, रा. कोंढवा बुद्रुक) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. खंडाळे याने या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहितचा मित्र वैभव साळवे याची आरोपी राठोड आणि साथीदारांशी भांडणे झाली होती. रोहित वैभव साळवे याच्याबरोबर फिरायचा. त्यामुळे आरोपी त्याच्यावर चिडून होते. रोहितला कोंढवा परिसरात गाठले. आमच्या दुश्मनाबरोबर फिरतो का?, अशी विचारणा करुन आरोपींनी रोहितला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्या वेळी नागरिकांनी रोहितला मदत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी नागरिकांवर कोयता उगारुन दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेला आरोपी पवन राठोडला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले तपास करत आहेत.