पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कोथरुडमधील मयूर काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी सराईत गुन्हेगारांसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल सोमनाथ साळुंखे (वय २२, रा. भेलके चाळ, गुजरात काॅलनी, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी साहिल ठोंबरे, आदित्य मारणे, बालाजी दळवी यांच्यासह एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोेंबरे याने या संदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठोंबरे, मारणे, दळवी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची साळुंखे याच्याशी भांडणे झाली होती. हेही वाचा >>> पुणे : बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरात जुगार अड्ड्यांवर छापा, गुन्हे शाखेकडून १८ जणांविरुद्ध गुन्हा साळुंखे दुपारी दीडच्या सुमारास मयूर काॅलनी परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी ठोंबरे, मारणे, दळवी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या एका साथीदाराने साळुंखेला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून गंभीर जखमी झालेल्या साळुंखेवर उपचार सुरु आहेत. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. शहरात गेल्या आठवड्यापासून कोयता गँगने वेगवेगळ्या भागात दहशत माजविल्याच्या घटना घडल्या आहेत.