पुणे : राज्यातील गुणवंत आणि उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची यंदाही दिरंगाई होणार असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत असताना राज्यातील शिक्षक पुरस्कारांबाबत अडचण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, पुरस्कारांची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दर वर्षी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) प्रदान करण्यात येतात. राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार, पुरस्कारांची घोषणा १५ ऑगस्टपर्यंत होणे आणि शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करणे अपेक्षित असते. गेल्या वर्षी शिक्षण विभागाला वेळापत्रकाचे पालन करता आले नाही. १८ सप्टेंबर रोजी पुरस्कारप्राप्त १०९ शिक्षकांची निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. त्यामुळे ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनाचा मुहूर्त साधता आला नव्हता. यंदाही अद्याप पुरस्कारप्राप्त शिक्षकांची घोषणाच झालेली नाही. त्यामुळे ५ सप्टेंबरला पुरस्कार प्रदान कार्यक्रम होऊ शकणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा, राज्यस्तरीय समित्यांमार्फत मुलाखतीची प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वीच पूर्ण झाल्याने यंदाचे राज्य शिक्षक पुरस्कार वेळेत जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, अद्याप पुरस्कारच जाहीर झालेले नाहीत. राज्य शिक्षक पुरस्कारांचे नियोजन दर वर्षीच बिघडत असल्यास या प्रक्रियेचे वेळापत्रक नव्याने निश्चित करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पातळीवर ५ सप्टेंबरला शिक्षकांचा सन्मान होत असताना राज्य पातळीवरील पुरस्कारांसाठी अनिश्चितता का, असा प्रश्न काही शिक्षकांनी उपस्थित केला.
राज्य शिक्षक पुरस्कारासाठीची अंतिम प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शासनस्तरावरून येत्या काही दिवसांत पुरस्कारप्राप्त शिक्षकांची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर पुरस्कार कार्यक्रम होईल. डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची सर्व प्रक्रिया वेळेत होते, तर राज्य शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीत अडचण काय आहे? शिक्षक दिनाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम शिक्षक दिनीच आयोजित केला पाहिजे. तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ
