पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये गेल्या काही वर्षांत घरांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. यामुळे या परिसरात घरांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. घरांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने घरभाडेही जास्त झाले आहे. या परिसरात घरांच्या किमती जास्त असूनही ग्राहकांची पसंती कायम आहे. क्रिसाला डेव्हलपर्सने हिंजवडीतील प्रकल्पात एकाच दिवसात सर्वाधिक घरांच्या नोंदणीचा विक्रम नोंदविला आहे.

क्रिसाला डेव्हपर्सकडून ‘क्रिसाला ग्रँड रेकॉर्ड रजिस्ट्री’ या उपक्रमांतर्गत पार पडलेल्या या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार असून, एका दिवसात विकसकाकडून करण्यात आलेल्या सर्वाधिक मालमत्ता करारांच्या नोंदणीचा हा विक्रम ठरला आहे. क्रिसाला डेव्हलपर्सने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करत एकाट दिवसात ३०० हून अधिक मालमत्ता नोंदणी पूर्ण केल्या. या उपक्रमादरम्यान दोन्ही रेकॉर्ड संस्थांचे अधिकारी उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी व प्रमाणीकरण करण्यात आले.

डिजिटल प्रणालीला चालना

उत्तर हिंजवडीतील क्रिसाला–हिरानंदानी टाऊनशिपच्या फेज १ आणि फेज २ तसेच क्रिसालाच्या इतर प्रकल्पांमधील घरांची नोंदणी या उपक्रमांतर्गत पूर्ण करण्यात आली. मर्यादित वेळेत मोठ्या प्रमाणावर पार पडलेल्या या नोंदणी मोहिमेमुळे शेकडो घरखरेदीदारांना एका दिवसात सहजपणे मालमत्ता नोंदणी पूर्ण करता आली. डिजिटल दस्तऐवजीकरण, सुलभ पडताळणी प्रक्रिया आणि समन्वयित नोंदणी व्यवस्थेच्या मदतीने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

हा उपक्रम देशातील डिजिटल व्यवहार प्रणालीला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या नोंदणी उपक्रमासाठी व्यापक पूर्वतयारी करण्यात आली होती. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, डिजिटल पायाभूत सुविधा उभारणी, ग्राहकांशी समन्वय, तसेच बँकिंग भागीदार आणि ग्राहक संबंध व्यवस्थापन पथकांची कामगिरी महत्वाची ठरली.

घराच्या आकारापेक्षा सुविधा महत्वाच्या

याबाबत बोलताना क्रिसाला डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अग्रवाल म्हणाले की, क्रिसालाच्या संकल्पनेवर घरखरेदीदारांनी दाखवलेला विश्वास या यशामागे महत्त्वाचा आहे. अवघ्या दोन महिन्यांत फेज १ ‘एव्हरलँड’ आणि फेज २ ‘एव्हर्लिन’ या प्रकल्पांमध्ये जवळपास २ हजार घरे विकली गेली. आजचे ग्राहक केवळ घराच्या क्षेत्रफळाकडे न पाहता संपूर्ण जीवनशैलीसाठी सुसंगत सुविधा देणाऱ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. या विक्रमी उपक्रमाद्वारे तंत्रज्ञान आणि नियोजनाच्या मदतीने डिजिटल युगात घरमालकीचा अनुभव अधिक सुलभ कसा होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.