आळंदीत माउली, श्रीकृष्ण जन्मोत्सव हरिनामाच्या गजरात उत्साहात साजरा

राज्यातील नामवंत कीर्तनकार-प्रवचनकार यांची सुश्राव्य सेवा माउली मंदिरात भाविकांनी श्रवण केली.

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माउलींचा जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात उत्साहात साजरा करण्यात आला.  माउली मंदिरात या निमित्त १९ ऑगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन-प्रवचन सेवेचे कार्यक्रम झाले. राज्यातील नामवंत कीर्तनकार-प्रवचनकार यांची सुश्राव्य सेवा माउली मंदिरात भाविकांनी श्रवण केली.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात येतो. या सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनातून श्रींच्या जन्मोत्सव कथा, जीवनचरित्र कथा भाविकांनी श्रवण केली. श्रीकांत श्रीमंत, अजित कुलकर्णी, संदीप पळसे, शिवाजीराव मोहिते, अरिवद महाराज, सचिन पवार यांचा यांनी प्रवचन सेवा केली. कीर्तन सेवेत शंकर बडवे, सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था ,श्रीकांत ठाकूरबुवा, वारकरी शिक्षण संस्था, कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था, चतन्य कबीर, बाळासाहेब चोपदार यांचा समावेश होता.

श्रींच्या जन्मोत्सवदिनी पहाटे घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक पूजा, दूध आरती, वेदघोष अभिषेक वेदमंत्र जयघोष झाला. जन्मोत्सव उपवास असल्याने महापूजा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गाथा भजन सांगता दिनी परंपरेने गाथा पूजन करण्यात आले. आळंदी देवस्थानतर्फे श्रींची गोकुळ पूजा प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांचे हस्ते झाली. त्यानंतर वंशपरंपरेने मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरिजागर, गावकरी भजन, खिरापत वाटप आदी कार्यक्रम झाले. श्रींचे जन्मोत्सव प्रसंगी पुष्पवृष्टी, आरती, सुंठवडा प्रसाद, उपवासाची खिरापत, मानकरी, सेवक, नारळ प्रसाद वाटप प्रथा परंपरेने करण्यात आले.

गोकुळाष्टमी सप्ताहासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, सर्व विश्वस्त, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, श्रींचे चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब पवार, राजेंद्र आरफळकर, सेवक मानकरी, कर्मचारी वृंद आदींनी नियोजन केले.

काल्याच्या कीर्तनाने आज सांगता

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात गुरुवारी (२५ ऑगस्ट) बापूसाहेब मोरे यांचे काल्याचे कीर्तन होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे. या निमित्त आळंदीतील विविध युवक-तरुण कार्यकत्रे आणि मंडळांनी दहीहंडी कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन केले आहे. सप्ताह कालावधीत आळंदी परिसरातील ग्रामस्थ-भाविकांनी महाप्रसाद, खिरापत वाटप करून तीर्थक्षेत्रातील अन्नदानाची परंपरा कायम ठेवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Krishna janmotsav celebration in pune