scorecardresearch

उलगडले कुमारजींच्या गायकीचे पैलू

त्यांची आलापी, ताना, स्वरस्थानांचे महत्त्व, राग विस्ताराचे सौंदर्य, आक्रमकता आणि भावस्पर्शता यांचा अनोखा संगम अशा वेगवेगळ्या अंगांनी ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांच्या प्रतिभासंपन्न गायकीचे विविध पैलू रविवारी उलगडले. तीन दशकांपूर्वी झालेल्या कुमारजींच्या गायन मैफलीची दृश्यफीत पाहताना रसिकांनी गंधर्व स्वरांचे …

त्यांची आलापी, ताना, स्वरस्थानांचे महत्त्व, राग विस्ताराचे सौंदर्य, आक्रमकता आणि भावस्पर्शता यांचा अनोखा संगम अशा वेगवेगळ्या अंगांनी ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांच्या प्रतिभासंपन्न गायकीचे विविध पैलू रविवारी उलगडले. तीन दशकांपूर्वी झालेल्या कुमारजींच्या गायन मैफलीची दृश्यफीत पाहताना रसिकांनी गंधर्व स्वरांचे गारुड अनुभवले.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची ठाशीव मुद्रा उमटविणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांच्या ९० व्या जयंतीचे औचित्य साधून कुमार गंधर्व प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र आणि आशय फिल्म क्लब ‘कालजयी कुमार गंधर्व’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वार्धात ‘कुमार गायकीचे संस्कार’ या विषयावर आरती अंकलीकर-टिकेकर, मंजिरी आलेगावकर, पं. राजा काळे आणि राहुल देशपांडे या गायकांनी कुमारजींच्या गायकीची वैशिष्टय़े अधोरेखित केली. प्रसिद्ध संवादिनीवादक चैतन्य कुंटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘कालजयी कुमार गंधर्व’ या द्विखंडात्मक ग्रंथाची प्रकाशनपूर्व नोंदणी करण्यात आली.
राजा काळे म्हणाले, शास्त्रीय संगीताला राग संगीत हा कुमारजींनीच योजलेला शब्द होता. त्यांची आलापी, ताना यांचा अभ्यास झाला पाहिजे. रागरूपाचे सौंदर्य आणि बंदिशीचा आशय यांचा उत्तम मिलाफ कुमारजींच्या गायकीमध्ये होता. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हा अलिखित संदेश त्यांच्या गायनात होता. परंपरा आणि सौंदर्य वेगळेपणाने कसे ठेवू शकतो या अंगानेही कुमारजींच्या गायनाकडे पाहिले पाहिजे.
आरती अंकलीकर म्हणाल्या, घराण्याच्या एका शिस्तीमध्ये गाणे शिकत असताना एकदा कुमारजींच्या ‘श्री’ रागगायनाची ध्वनिफीत ऐकली. स्वरांच्या पलीकडे जाणे म्हणजे काय याची जाणीव ते गायन ऐकून झाली. स्वरस्थान, तालाचा योग्य वापर यातून त्या रागाची वाट मोकळी आणि सुलभ व्हावी असेच त्यांचे गाणे होते. बंदिश ही रागाकडे पाहण्याची खिडकी आहे, असेच ते म्हणत. ‘बाहेर जेवढे शिकतो त्याहून अधिक गाणं हे आतमध्ये आहे’ असे सांगणारे कुमारजी यांच्यासाठी संगीत हा आत्मशोधाचा प्रवास होता.
मंजिरी आलेगावकर म्हणाल्या, माझ्यावर कुमार गायकीचे संस्कार वडिलांनीच केले. आक्रमकता आणि भावस्पर्शता यांचा संगम कुमारजींच्या गाण्यामध्ये होता.
राहुल देशपांडे म्हणाले, कुमारजींच्या घराजवळ राहता यावे यासाठी वसंतरावांनी भाडय़ाने बंगला घेतला होता. एका अर्थाने कुमार भक्ती ही माझ्याकडे रक्तातूनच आली आहे.
कुमार स्वरांचे गारुड
तीन दशकांपूर्वी दिल्ली येथे बाळासाहेब चितळे यांच्या निवासस्थानी झालेल्या कुमार गंधर्व यांच्या गायनाची दृश्यफीत पाहताना रसिकांनी कुमार स्वरांचे गारुड अनुभवले. ‘तोडी’ आणि ‘भैरव’ या रागगायनानंतर भैरवीने जणू कुमारजी आपल्यासमोर मैफल सादर करीत आहेत या जाणिवेतून रसिक दीड तास गंधर्व गायकीच्या स्वरांनी भारले गेले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-04-2014 at 03:00 IST

संबंधित बातम्या