पुणे : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक देण्यात येणार आहेत. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत या निर्णयाला अंतिम रूप देण्यात येणार आहे.
नाशिक येथे दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा २०२६-२७ दरम्यान होणार आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असतो. कुंभमेळ्यासाठी देशभरातून, तसेच परदेशातूनही लाखो भाविक येतात. त्यामुळे प्रशासनाला कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर नियोजन करावे लागते. कुंभमेळ्यात वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, सीसीटीव्ही, गर्दी व आपत्ती व्यवस्थापन, संशोधन, पर्यावरण संवर्धन यांसह अन्य अनेक प्रकारच्या कामांसाठी प्रशासन आणि पोलिसांना विद्यार्थी मदत करू शकतात. या पार्श्वभूमीवर, कुंभमेळ्यातील योगदानासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी मांडला होता. या ठरावाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेत मान्यता देण्यात आली आहे.
वैद्य म्हणाले, ‘या पूर्वीच्या कुंभमेळ्यांत विद्यार्थी, शिक्षक अशा घटकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान दिलेले आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या योगदानासाठी श्रेयांक मिळणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवस्थापकीय, संशोधन, नियोजनाच्या कामाचा अनुभवही मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला आवश्यक सहायक मनुष्यबळ उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा अनोखा शैक्षणिक उपक्रम ठरणार आहे.’
‘याबाबत कुंभमेळा प्रशासन, पोलिसांसह दोन बैठका झाल्या आहेत. विद्या परिषदेतही श्रेयांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. आता प्राचार्यांची बैठक घेऊन स्वरूप अंतिम करण्याच्या सूचना अधिष्ठात्यांना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती डॉ. काळकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांना ‘ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट’अंतर्गत दोन श्रेयांक देण्याची तरतूद आहे. कुंभमेळा हा मोठा सोहळा आहे. या भव्य सोहळ्यातील वेगवेगळ्या कामांसाठी विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार काम करू शकतात. दोन श्रेयांकांसाठी ६० तास काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रेयांक मिळण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक दिले जातील. प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. – डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

