Pune Maval Bridge Collapse Updates: पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पाण्यात पडलेल्या इतर सर्व नागरिकांना वाचवण्यात यश आल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात असलं, तरी सोमवारी सकाळी ड्रोनच्या सहाय्याने इंद्रायणी नदीची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भीषण दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार चालू आहेत. त्यातीलच एका जखमीने एबीपी माझाशी बोलताना घटना घडली तेव्हाचा विदारक प्रसंग सांगितला.

कुंडमळ्यात नेमकं काय घडलं?

रविवारी १५ जून रोजी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंडमळ्यात मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. या पुलावरून पलीकडे मंदिर असून तिथे दर्शनाला जाणाऱ्या-येणाऱ्यांची, तसेच समोरचा पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची कुंडमळ्यातील या पुलावर नेहमीच मोठी गर्दी होते. रविवारीही दुपारी ३.३० च्या सुमारास अशीच गर्दी या पुलावर असतानाच पुल कोसळला आणि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य चालू होतं.

“गर्दीमुळे पुल अक्षरश: हलत होता”

दरम्यान, पुल कोसळल्यामुळे जखमी झालेले योगेश व शिल्पा बंडरेलो यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यापैकी योगेश यांनी घटना घडली तेव्हा नेमकं काय घडलं, तो विदारक प्रसंग सांगितला आहे. “मी आणि माझी पत्नी पुलावरून जात होतो. समोर गर्दी असल्यामुळे आम्ही गाडी ६०० मीटर अलिकडेच लावली. मी पत्नीला म्हटलं आपण चालत जाऊ. आम्ही पुलाच्या मध्यभागी पोहोचलो तेव्हा एक बाईक मंदिराकडे जात होती आणि एक बाईक विरुद्ध दिशेनं येत होती. त्या दोन्ही बाईकला जाण्यासाठी जागा नसताना ते खूप गडबड करत होते. इतर लोकांनीही मोठी गर्दी केली होती”, असं योगेश म्हणाले.

“प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. कुणीच थांबायला तयार नव्हतं. त्या वेळी त्या संपूर्ण परिसरात पाचेक हजार लोक असतील. पुलावर तेव्हा १ ते २ हजार लोक होते. आम्ही सगळेजण मंदिरात पाया पडण्यासाठ निघालो होतो. त्यावेळी पूल अक्षरश: गर्दीमुळे, वजनामुळे हलत होता. गर्दीचा भार पुलाला सहन झाला नाही. गर्दीमुळे, बाईक तिथून नेण्यामुळे पूल कोसळला. माझ्यासमोर तीन लोक मेले. पुलाचे रॉड त्यांच्या पाठीवर पडून त्यांचा मणका तुटला इतकी भीषण परिस्थिती तिथे होती”, असं योगेश यांनी सांगितलं.

“गर्दीमुळे पूल एका बाजूला झुकला होता”

“तिथे खूप गर्दी झाली होती. काही बाईक ये-जा करत होत्या. त्यामुळे पूलवर मोठी गर्दी झाली होती. लोकंही तिथे जमली होती. तो पूल खूप जुना होता. त्यामुळे तो एका बाजूला झुकला आणि संपूर्ण पूल नदीत कोसळला. जे पुलावर मध्यभागी उभे होते, ते पाण्यात वाहून गेले. जे थोडे बाजूला होते, ते आमच्यासारखे काही लोक दगडांवर आपटले. काहींना डोक्याला लागलं, काहींना पायाला लागलं”, अशी प्रतिक्रिया या अपघातातील एक जखमी संजय लक्ष्मण गोठे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कुंडमळ्यातील पूल किमान ४० फूट खाली कोसळला”

“पुलावर लोक एकाच ठिकाणी जमले होते. काही बाईकही पुलावर ये-जा करत होत्या. पूल कमकुवत झालेला दिसत होता. मला शंका आली की पूल हलतोय. मी माझ्या बहिणीला हे सांगेपर्यंत पूल कोसळला. किमान ४० फूट खाली पूल कोसळला असेल”, अशी प्रतिक्रिया आणखी एक जखमी सुनील कुमार यांनी एएनआयला दिली.