पुणे : कुरकुंभ (ता.दौंड) औद्योगिक क्षेत्रात टँकरमधून अमोनिया वायूची गळती झाल्याची बातमी येते. शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागतात. पोलीस, अग्निशमन दल, वैद्यकीय पथ घटनास्थळी दाखल होते. आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना लगेचच सुरू होतात. त्यानंतर हा केवळ आपत्कालीन सराव असल्याचे स्पष्ट होते आणि सर्वच जण सुटकेचा नि:श्वास सोडतात.

संभाव्य औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीत विविध औद्योगिक आस्थापना, शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय, तत्परता व आपत्कालीन प्रतिसादाची कार्यक्षमता तपासण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी संयुक्त आपत्कालीन सराव यशस्वीरीत्या पार पडला. या सरावामध्ये अमोनिया वायूची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अमोनिया वायूची गळती होऊन गुडलक चौक परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे काल्पनिक दृश्य तयार करण्यात आले. या परिस्थितीला अनुसरून बचावकार्य, प्रथमोपचार, जखमींचे स्थलांतर, अग्निशमन, वाहतूक नियंत्रण, परिसर सुरक्षित करणे तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.

सरावामध्ये चार जखमींची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. सहभागी पथकांनी निश्चित केलेल्या वेळेत घटनास्थळी पोहोचून श्वसन संरक्षण संच, सुरक्षा पथक, प्रथमोपचार पथक, अग्निशमन पथक, रुग्णवाहिका आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणेचा प्रभावी वापर करत नियोजित पद्धतीने कार्यवाही केली. या सरावामध्ये क्लीन फिनो केम, अल्काइल अमाइन्स, सिप्ला, एटर्निस, एमक्युअर, ऑनर लॅब, कारगिल, हेनकेल, हार्मनी ऑरगॅनिक्स आणि कुरकुंभमधील इतर कंपन्यांनी सहभाग घेतला.

व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक सुधीर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सरावामध्ये उपसंचालक अंकुश खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिनिधी विठ्ठल बनोटे, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे अधिकारी प्रवीण पाटील, विष्णू सांगोलकर, महेंद्र सावंत, विनोद मदुरकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर, पोलीस, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, स्थानिक प्रशासन तसेच विविध औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी केवळ उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध असणे पुरेसे नाही. जलद निर्णयक्षमता, प्रभावी संवाद, परस्पर समन्वय आणि नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे. अशा संयुक्त सरावामुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी जीवित व मालमत्तेची हानी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक तयारी अधिक सक्षम करता येते. – हनुमंत पाटील, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ