पिंपरी महापालिकेच्या वतीने निगडी येथे सुरू करण्यात आलेल्या संगीत अकादमीतील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. या समस्यांकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अकादमी चांगल्या प्रकारे चालवायची असेल, तर अकादमीच्या वास्तूमध्ये विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने महापालिकेने निर्णय घ्यावा, अशी मागणी अकादमीच्या वतीने करण्यात आली आहे.
अकादमीचे मानद सल्लागार पं. नंदकिशोर कपोते यांनी यासंदर्भात सांस्कृतिक समितीचे सभापती समीर मासूळकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. अकादमीचे मुख्य सभागृह वातानुकूलित करण्याची मुख्य मागणी असून वास्तूच्या प्रत्येक दालनात अद्ययावत फर्निचर उपलब्ध करून द्यावे, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्या तसेच कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारे गालिचे उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असतात, तेव्हा त्यांच्यासाठी चांगली बैठक व्यवस्था असणे आवश्यक असली, तरी तशी व्यवस्था अकादमीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिकवायला येणाऱ्या शिक्षकांसाठी चांगली बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
संस्थेत दोन संगणक आवश्यक आहेत. तसेच संस्थेच्या नित्य कामाच्या दृष्टीने काही नवीन वाद्यांची खरेदी करणेही आवश्यक आहे. त्या बरोबरच संस्थेत सध्या असलेल्या जुन्या वाद्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याचीही व्यवस्था करावी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संस्थेत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी संगीत व अन्य क्षेत्रातील मंडळी येत असतात. या पाहुण्यांना बसण्यासाठी देखील चांगली व्यवस्था असणे आवश्यक आहे. संस्थेच्या वास्तूतील खिडक्यांची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच स्वागत कक्ष तयार करावा, अकादमीसाठी पूर्ण वेळ लिपिक मिळावा, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.