पिंपरी पालिका रुग्णालयांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक उपचारासाठी येतात. मात्र, बहुतांश पालिका रुग्णालयांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे उघड गुपित आहे. रुग्णालयांचे अग्निसुरक्षाविषयक लेखापरीक्षण होत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर परिस्थिती हाताळण्याची यंत्रणाच नाही. कुशल कर्मचाऱ्यांचा अभाव असून मनुष्यबळाची तसेच रुग्णवाहिकांची कमतरता असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील ‘शिशू केअर युनिट’ला आग लागून झालेल्या दुर्घटनेत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर, पिंपरी पालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पालिकेतील रुग्णालयांच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला असता, सर्वकाही ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र समोर आले आहे.

यशवंतराव चव्हाण रुग्णालय, तालेरा रुग्णालय, भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय अशा आठ मोठय़ा रुग्णालयांसह २७ दवाखाने शहरात आहेत. पुणे, पिंपरीसह राज्याच्या विविध भागातील हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी आवश्यक सुरक्षाविषयक बाबींचा अभाव असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. चव्हाण रुग्णालयात यापूर्वी अपघात झाले, तेव्हा-तेव्हा अग्निशामक दलाला पाचारण करण्यापलीकडे कोणतीही कृती झाल्याचे ऐकिवात नाही. रुग्णालयांमध्ये सुरक्षाविषयक उपकरणे आहेत. मात्र, त्याचा वापर करणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांची वानवा आहे.

रुग्णालयांचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ होत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाला पाचारण करणे, हेच प्रमुख काम मानले जाते. मात्र, अग्निशामक विभागही सक्षम नसल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. पालिकेच्या आरोग्यव्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट आहेत. भंडाऱ्यातील घटनेच्या पाश्र्वभूमीवर, एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच पालिका रुग्णालयांमधील त्रुटी दूर कराव्यात, आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशी मागणी होत आहे.

भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर रुग्णालयांच्या व्यवस्थेतील दोष आणि कमतरता समोर आल्या आहेत. संपूर्ण आरोग्य व्यवस्थांचे मजबुतीकरण होणे आवश्यक आहे. पिंपरी पालिकेच्या रुग्णालयांमध्येही एखादी दुर्घटना होण्याची वाट न पाहता तत्काळ उपाययोजना अपेक्षित आहेत.    – राहुल जाधव, माजी महापौर, पिंपरी

पालिका रुग्णालयांच्या सुरक्षेविषयक सर्व काळजी घेण्यात आली आहे. भंडाऱ्यातील दुर्घटना पाहता रुग्णालयांमध्ये अधिक खबरदारी घेतली जाईल. त्यादृष्टीने अपेक्षित कार्यवाही सुरू आहे.     – डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी