scorecardresearch

भूमी अभिलेख विभागाची रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस होणार!

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा

(प्रातिनिधिक छायाचित्र)

भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरीता तब्बल एक हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात १६३, कोकण प्रदेश-मुंबई २४४, नाशिक १०२, औरंगाबाद २०७, अमरावती १०८ आणि नागपूर विभागात १८९ जागा आहेत.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाइन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरूस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे.

विद्यार्थ्यांकडून आता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क नाही –

याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, “भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती करण्यात येणार आहे. आता टीसीएस कंपनीची परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आठ दिवसांत कंपनीसोबत बैठक होऊन मे अखेरीस परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. परीक्षा घेणारी कंपनी बदलली असली, तरी विद्यार्थ्यांकडून आता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. टीसीएस कंपनीला त्यांच्या कामाचा पैसे राज्य शासनाकडून अदा केले जातील.”

१०२० पदांसाठी तब्बल ७६ हजार अर्ज –

दरम्यान, १०२० पदांसाठी तब्बल ७६ हजार अर्ज आले होते. त्यापैकी ४६ हजार ८०० अर्ज वैध ठरले आहेत. संबंधित उमेदवारांचे पैसै ऑनलाइन पद्धतीने पुन्हा थेट बँक खात्याच जमा करण्यात येत आहेत. भरती झाल्यानंतर प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून निवड झालेले उमेदवार रुजू न झाल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संगणकीकृत विदा पोलिसांनी जमा केल्याने भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षेसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांची माहिती देखील पोलिसांकडे गेली, ही माहिती मागवली आहे.

जमाबंदी आयुक्तांची टीम प्रश्नपत्रिका तयार करणार –

विविध शासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षेसाठी जमाबंदी आयुक्त के. सुधांशू यांच्या टीमकडून प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे. ही प्रश्नपत्रिका उमेदवारांना ऑनलाइन लॉगइन केल्यानंतर थेट संगणकावरच दिसणार आहे. टीसीएसच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला ही प्रश्नपत्रिका दिसणार नाही, असेही रायते यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Land records departments recruitment exam will be held by the end of may pune print news msr