पिंपरी : दिघीतील स्वराज्य काॅलनीतील ११ झाडे उत्खनकाच्या साहाय्याने विनापरवाना मुळासकट काढल्याचा आणि नऊ झाडांची छाटणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागाने जागामालकाला प्रति झाड ५० हजार आणि फांद्या छाटणीचे दहा हजार, असा नऊ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. दंडाची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना नाेटीस देण्यात आली आहे. दिघी येथील स्वराज्य काॅलनी, पठारे काॅलनीतील माेकळ्या जागेत झाडे होती. त्यातील एक नारळ, दोन साग, दोन स्पॅथाेर्डिया, तीन फायकस, एक परिजातक, एक सुपारी आणि एक तुती अशी ११ झाडे विनापरवाना उत्खनकाच्या साहाय्याने मुळासकट काढली. तसेच एक अंबाडी, चार आवळा, एक काजू, एक बदाम, एक काॅफी, एक गुलमाेहर अशा नऊ झाडांची छाटणी केली.
या विनापरवाना वृक्षताेडीची तक्रार महापालिकेच्या उद्यान व संवर्धन विभागाकडे आली हाेती. त्यानुसार उद्यान सहायक आणि सहायक उद्यान अधीक्षकांनी जागेवर जाऊन पंचनामा केला. त्यानुसार दंडात्मक कारवाई का करू नये, अशी नाेटीस जागामालकाला देऊन खुलासा मागविला. मात्र, त्यांनी महापालिकेकडे काेणताही खुलासा केला नाही. त्यामुळे दंड भरण्याची नाेटीस दिली आहे.
मुदत संपूनही दंडाचा भरणा नाही
जागामालकाला महापालिकेने १५ मे २०२५ राेजी दंड भरण्याची नाेटीस दिली हाेती. ही नाेटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) स्वरूपात उद्यान विभागाच्या बँक खात्यावर पैसे भरावेत, असे सांगितले हाेते. परंतु, मुदत संपून १५ दिवस झाले, तरी संबंधित जागामालकाने दंडाची रक्कम भरलेली नाही.
विनापरवाना झाडे ताेडल्याप्रकरणी संबंधित जागामालकाला नऊ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. दंडाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. सात दिवसात रक्कम जमा न झाल्यास फाैजदारी कारवाई करण्यात येईल. – उमेश ढाकणे, सहायक आयुक्त, उद्यान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका