लोणावळा : मुंबई-पुणे लोहमार्गावर मंकी हिल परिसरात पहाटे दरड कोसळली. डोंगर कपारीतील निसटलेला मोठा दगड रेल्वे इंजिनाखाली आल्याने इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आठवडय़ापूर्वी या परिसरात दरड कोसळली होती.

मंकी हिल परिसरात लोहमार्गावर मंगळवारी (२४ ऑगस्ट) पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर लोहमार्गावर मोठा दगड पडला. दगड इंजिनाखाली अडकल्याने इंजिन रुळावरून उतरले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी तेथे पोहोचले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू केले. मोठा दगड इंजिनाच्या गार्डमध्ये अडकला होता. गार्डमधील मोठा दगड काढण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहायाने इंजिन पुन्हा रुळावर नेण्यात आले. 

गेल्या काही दिवसांत लोहमार्गावर दरड कोसळण्याची ही तिसरी घटना घाहे. घाटमाध्यावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगर कपारीतील दगड सैल झाले आहेत. डोंगररांगातून पाणी वाहत असल्याने सैल झालेले दगड घसरत आहेत. मुंबई-पुणे लोहमार्गावर मंकी हिल परिसरातील लोहमार्ग डोंगररांगातून जातो. या भागात दरड कोसळण्याचा घटना नेहमी घडतात.

दरम्यान, मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले.