बंगळुरू-मुंबई बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात असलेल्या डुक्कर खिंडीत डोंगर फोडून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. पावसामुळे तेथे दरडी कोसळण्याचा धोका असून हे काम युद्धपातळीवर करण्यात यावे तसेच दरडी कोसळू नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात , अशी मागणी क्रिएटिव्ह फाऊं डेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
बाह्य़वळण मार्गावर वारजे परिसरातील डुक्कर खिंड अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. बाह्य़वळण मार्गावर वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक रहिवाशांबरोबरच मुंबई व बंगळुरूच्या दिशेने जाणारे वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. डुक्कर खिंड फोडून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. शनिवारी (२ जुलै) मी चांदणी चौकातून वारजेच्या दिशेने निघालो होतो. त्या वेळी अचानक मोठा दगड टेकडीवरून खाली घरंगळत आला. रस्त्यावर पडलेल्या दरडींमुळे दगडाचा वेग कमी झाला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे खर्डेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. खर्डेकर यांनी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता वाबळे यांना निवेदन दिले आहे.
‘मुळात हे काम दीर्घकाळ रखडलेले आहे. शहरात संततधार पाऊस सुरू आहे. डुक्कर खिंडीतील दरडी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे त्वरित सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात,’ अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.