पुणे : एका चार वर्षीय मुलीला सतत खोकला येऊ लागला. पालकांनी तिला रुग्णालात आणले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्या पोटात काही वस्तू असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या पोटात आणि आतड्यांत गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी लॅपरोटोमी या खुल्या प्रक्रियेच्या माध्यमातून मुलीच्या पोटातून ही वस्तू बाहेर काढली त्यावेळी ती चुंबकीय ब्रेसलेट असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील पोटविकारतज्ञ डॉ.प्रमोद कटारे म्हणाले की, मुलीच्या पोटातबाहेरची वस्तू गेल्याचे एक्स-रे मध्ये दिसत होते. ही वस्तू त्या मुलीने गिळली होती हे पालकांना माहिती नव्हते. अशा परिस्थितीत बाहेरील वस्तू काढण्यासाठी सहसा एंडोस्कोपीचा वापर केला जातो.
मात्र एंडोस्कोपी करताना आत गेलेली वस्तू ही ब्रेसलेट असल्याचे लक्षात आले. या गोल चुंबकीय ब्रेसलेटच्या बाजू एकमेकाला तशाच जोडलेल्या स्थितीत होत्या. त्यातील एक भाग पोटात होता आणि दुसरा भाग छिद्र करत छोट्या आतड्यातून पोटाच्या बाहेर आला होता. या अशा स्थितीमुळे एंडोस्कोपीच्या माध्यमातून ही वस्तू बाहेर काढणे शक्य नव्हते. त्याशिवाय हे ब्रेसलेट एका महत्त्वाच्या रक्तवाहिन्याच्या मागेपर्यंत पोहचले होते आणि छोट्या आतड्याच्या दोन भागांमध्ये त्याने छिद्र पाडले होते.याशिवाय पहिले छिद्र हे जठाराजवळ होते. उपचारात कुठलीही दिरंगाई ही जोखीम वाढविणारी होती. त्यामुळे खुली शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
लॅपॅरोटोमी प्रक्रिया कशी?
बालरोगतज्ञ डॉ.प्रणव जाधव म्हणाले की, मुलीच्या सीटी स्कॅनमधून ब्रेसलेटची गुंतागुंत आणि एकंदर परिस्थितीचे स्पष्ट चित्र दिसून आले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आम्ही लॅपॅरोटोमी प्रक्रिया केली.या प्रक्रियेमध्ये ओटीपोटाच्या भिंतीला छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जाते.अनेक चुंबक असलेल्या या ब्रेसलेटमुळे पोटात आणि आतड्यात छिद्र निर्माण केले होते. याचबरोबर छिद्र पडल्यामुळे मलस्वरूपातील अन्न छिद्रातून बाहेर येऊन शरीरात पसरले असते तर मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये आम्ही ब्रेसलेट बाहेर काढले व छिद्र पडलेल्या तीन ठिकाणी जखमा साफ करून तिथे टाके बसविले. शस्त्रक्रियेनंतर या मुलीला दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तिला एका आठवड्यात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा तपासणीसाठी पालक मुलीला घेऊन आले. त्यावेळी मुलीचा प्रकृती चांगली झाल्याचे आढळले. तसेच, ती व्यवस्थितपणे खाऊ-पिऊ लागली आहे.
मुलांकडे अधिक लक्ष द्यावे
लहान मुले ६ वर्षांची होऊपर्यंत त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याचे कारण कोणतीही वस्तू तोंडात घालण्याची सवय लहान मुलांना असते. काही वेळेला या वस्तू मुलांकडून गिळल्या जातात. चुंबकीय ब्रेसलेट,नाणी व इतर छोट्या वस्तू या हानिकारक ठरू शकतात. अशा वस्तू लहान मुलांपासून या दूर ठेवाव्यात. याचबरोबर मुले कोणत्या वस्तूंसोबत खेळत आहेत, यावर बारकाईने लक्ष ठेवावी. मुले गिळू शकतील अशा, वस्तू त्यांना खेळण्यास देऊ नये, असा सल्ला डॉ. प्रमोद कटारे आणि डॉ. प्रवीण जाधव यांनी दिला.
