अविनाश कवठेकर पुणे : मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत प्राप्त करण्यासाठी पुणेकर उदासीन असल्याचे पुढे आले आहे. शहरातील सुमारे तीन लाखांहून अधिक मिळकतधारकांची ही सवलत काढून घेण्यात आली असताना ही सवलत मिळावी, यासाठी केवळ ७५ हजार मिळकतधारकांनी महापालिकेकडे अर्ज केला आहे. ही मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार असून अर्जवाढीला मुदतवाढ मिळण्याची शक्यताही कमीच आहे. आणखी वाचा-World Cup 2023: भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामन्याचे ब्लॅकने तिकीट विकणारे पोलिसांच्या जाळ्यात! शहरातील निवासी मिळकतींना वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत १ एप्रिल २०२३ पासून रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. त्यामुळे ही सवलत कायम ठेवावी, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळाने आणि त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनातही मंजुरी मिळाली होती. सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात काहीसा विलंब झाल्याने यंदा मिळकतकराची नियमित देयके देण्यासही उशीर झाला होता. तसेच ज्या तीन लाखांहून अधिक मिळकतधारकांची ही सवलत रद्द करण्यात आली आहे, त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज करावा, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी १५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, सवलत पुन्हा प्राप्त करून घेण्यास मिळकतधारकांची उदासीनता असल्याचे पुढे आले आहे. आणखी वाचा-भिडेवाड्यासंदर्भात महापालिकेकडून ‘कॅव्हेट’ दरम्यान, मुदतीनंतरही मिळकतधारकांना सवलत मिळावी, यासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र त्यांना पूर्वीचा लाभ मिळणार नाही. ज्या दिवशी अर्ज दाखल होईल, तेव्हापासून ही सवलत लागू केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करआकारणी आणि करसंकलन विभागाने तीन लाखांहून अधिक मिळकतधारकांची सवलत रद्द केली होती. त्यांपैकी एक लाख मिळकतधारकांना थकीत रकमेसह कर भरण्याची नोटीस बजाविण्यात आली होती. ही रक्कम सुमारे ३५० कोटी एवढी आहे. मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत कायम करण्यासाठी महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. आतापर्यंत महापालिकेकडे ७५ हजारांच्या आसपास अर्ज आले आहेत. मिळकतधारकांकडून येत्या काही दिवसांत अर्ज करण्याची शक्यता आहे. मात्र, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात अद्यापही विचार झालेला नाही. -अजित देशमुख, विभागप्रमुख, करआकारणी आणि करसंकलन विभाग