पुणे : लावणी सादरीकरणातील वाढत्या अश्लीलतेवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी करत तमाशा कलावंतांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात निवेदन पाठविण्यात आले असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्धार लावणी कलाकारांनी रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला.
लोककला आणि लावणीचे कार्यक्रम पारंपारिक पद्धतीनेच सादर झाले पाहिजेत. डीजे लावून अश्लील कार्यक्रम करणाऱ्यांवर निर्बंध असायला हवेत, या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारच्या वतीने त्वरित स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीस ज्येष्ठ लावणी कलाकार मंगला बनसोडे, बरखा जळगावकर, अप्सरा जळगावकर, राजश्री काळे-नगरकर, वनमाला बागूल, संगीत बारी (कला केंद्र) असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जाधव, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे प्रदेश सचिव मोहित नारायणगावकर, अखिल महाराष्ट्र लोककलावंत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नारायण जावळेकर, कार्याध्यक्ष शिवाजी जावळेकर उपस्थित होते.
बनसोडे म्हणाल्या, ‘महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणी आणि तमाशाला अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र, मध्यंतरी डीजेच्या तालावर नृत्य सादरीकरण सुरू झाले. त्याचा परिणाम पारंपारिक लोककलेवर होत आहे. राज्य सरकारने सेन्सॉर बोर्ड स्थापन करून पारंपरिक लोककलेला नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी.’
लावणी आणि तमाशा ही आमच्यासाठी केवळ कला नाही. तर, परंपरा, संस्कृती आणि उदरनिर्वाहाचे साधन आहे. आम्ही या कलेला नेहमीच सन्मानाने जपले आहे. मात्र, आता व्यावसायिक स्पर्धेतून लावणीचे मूळ स्वरूप बदलताना दिसत आहे. आधुनिकतेला विरोध नाही, पण परंपरेचा आत्मा जपला गेला पाहिजे. कलाकारांना प्रशिक्षण, योग्य व्यासपीठ आणि सन्मान मिळाला, तरच महाराष्ट्राची लोककला पुन्हा अभिमानाने उभी राहील. – बरखा जळगावकर, लावणी कलावंत.
डीजे लावणी प्रकारांवर बंदी घाला
डीजे लावणी कार्यक्रमावर आणि अश्लील सादरीकरणांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन स्थापन करावे, या प्रमुख मागणीसह सर्वांनी एकमताने ठराव करून डीजे लावणी प्रकारावर शंभर टक्के बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
