पुणे : हडपसरमधील फुरसुंगी भागात असलेल्या पोलाद व्यावसायिकाचे गोदाम, तसेच कार्यालयावर ५० कोटींच्या खंडणीसाठी लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील सराइतांनी गोळीबार केल्याचे घटना उघडकीस आल्यानंतर बिष्णोई टोळीने एका ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकाविल्याचे उघडकीस आले.

हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी भागात ओैषध वितरकाचे दुकान आहे. बिष्णोई टोळीने ओैषध वितरकाला समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन धमकावल्याची माहिती पोलिसांना बुधवारी (२४ जून) मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोमवारी (२२ जून) हडपसरमधील फुरसुंगी परिसरात एका पोलाद व्यावसायिकाच्या कार्यालय, तसेच गोदामावर बिष्णोई टोळीतील सराइतांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली. पोलाद व्यावसायिकाकडे ५० कोटींची खंडणी, तसेच गोळीबार केल्या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बिष्णोई टोळीतील आरजू बिष्णोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी पसार झाला असून, गुन्हे शाखेकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच सासवड रस्त्यावरील वडकी भागात असलेल्या ओैषध वितरकाला खंडणीसाठी दूरध्वनी केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे.

फुरसुंगी गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मागावर पोलीस

फुरसुंगीतील पोलाद व्यावसायिकाच्या गोदामावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे. तो लाॅरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असून, तो फुरसुंगी भागातील एका कंपनीत कामगार होता. त्याने पोलाद व्यावसायिकाची माहिती घेऊन त्याच्या व्यवसायाबाबतची माहिती बिष्णोई टोळीला पुरविल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणाचा गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी आरीपीला पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागात असलेल्या एका फर्निचर दालनावर गोळीबार करुन बिष्णोई टोळीने खंडणीसाठी धमकावले होते. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बिष्णोई टोळीतील सराइतांना अटक केली होती.