पुणे : ‘महात्मा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या रूपाली चाकणकरांनी एखाद्या भोंदू बाबाला गुरू मानावे? सावित्रीची मुलगी म्हणवून घ्यायला, त्यांना लाज वाटली पाहिजे. रूपालीताई, मोठी चूक केलीत. तुमचा जाहीर निषेध करतो. त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे,’ अशा शब्दांत ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या रूपाली चाकणकरांवर टीका केली.
‘भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. पण, महात्मा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या रूपालीताईंना जास्त शिक्षा करा. त्यांची नैतिक जबाबदारी जास्त होती. एवढी मोठी चूक करायची नसते. केली, तर व्यक्तिगत पातळीवर निस्तरायची असते. पण, तुम्ही जाहीरपणे सांगता, की त्यांना मी गुरू मानते,’ असेही ते म्हणाले. आर्य पब्लिकेशन्स, बहुजन संघटक आणि भारतीय समता संघातर्फे माने यांच्या हस्ते संदीप सारंगलिखित ‘बीच का रास्ता नहीं होता’ आणि संदीप सारंग व अरुण विश्वंभर संपादित ‘मी बुद्धाकडे चाललो आहे’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
माने म्हणाले, ‘नव्या जगात पुस्तके किती प्रभावी असतील, याबाबत मला विश्वास नाही. आता प्रत्येकाच्याच खिशात एक मोबाइल आहे. महाविद्यालयापासून विद्यापीठापर्यंत सगळीकडेच, परिवर्तनाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणार नाही, अशा पद्धतीची रचना आहे. मुलांना लिहिता येणार नाही, वाचता येणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आहे. आता जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत.’
‘पोटाला चिमटे घेऊन पोरांना इंग्रजी शाळेत घातले जाते. पालकांनी मोठ्या हौसेने इंग्रजी माध्यमात घातलेल्या पोरांची अवस्था आता ‘ना घर का, ना घाट का,’ अशी झाली आहे. त्यांना धड मराठी येत नाही, ना इंग्रजी येते. हे बहुजन समाजाचे मोठे नुकसान आहे. यासाठी आपण लढलो नाही, तर समाज आपल्याला माफ करणार नाही,’ असे त्यांनी नमूद केले.
‘आज रुढी-परंपरेची जोखडे फेकून देऊन धर्मांतर केलेल्या ९० टक्के भटक्यांनी स्वतःची घरे बांधली आहेत. संघर्ष केला, चळवळ सक्षम केली. त्यामुळेच हा बदल घडवता आला. आता जेजुरीची यात्रा बंद पडत आली. गाढवांचा व्यापार आता बंद झाला. आम्ही रूढी-परंपरा फेकून दिल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी असे व्यवसाय केले. आता पुन्हा एकदा परंपरांचे जोखड फेकून सगळ्या बहुजन, दलित समाजाने एकत्र येण्याची गरज आहे,’ अशी सादही माने यांनी घातली.
किसन चव्हाण, संघमित्रा खोरे, चैतन जनाबाई, राजाराम पाटील यांनी सामाजिक व्यवस्थेवर भाष्य केले. राष्ट्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर उपस्थित होते. अरुण विश्वंभर यांनी आभार मानले.
