“कंगना, विक्रम गोखले आणि अवधुत गुप्ते यांनी ८ दिवसात माफी मागावी, अन्यथा घराबाहेर…”, उपराकार लक्ष्मण मानेंचा इशारा

पुण्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन कंगना रणौत, विक्रम गोखले आणि अवधुत गुप्ते या तिघांच्या विधानाचा निषेध नोंदवला.

सिनेअभिनेत्री आणि पद्मश्री कंगना रणौत हिने देशाला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळाल्याचे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर तिच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्या विधानचे समर्थन केले. यानंतर गायक अवधूत गुप्ते यांनी देखील गोखले अभ्यासपूर्वक बोलतात म्हणत अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आज (१९ नोव्हेंबर) पुण्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन तिघांच्या विधानाचा निषेध नोंदवला. तसेच येत्या ८ दिवसात या तिघांनी देशातील जनतेची माफी मागावी, अन्यथा पुण्यात विक्रम गोखले घराबाहेर सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लक्ष्मण माने म्हणाले, “सिनेअभिनेत्री कंगना रणौत हिने पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर विक्रम गोखले आणि गायक अवधूत गुप्ते यांनी देखील समर्थन केले. त्यामुळे मी तिघांचा निषेध व्यक्त करतो. देशाच्या स्वातंत्र्या लढ्यात जे शहीद झाले त्या सर्वांचा तिघांनी अपमान केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तातडीने कारवाई झाली पाहिजे. याविरोधात आज मी पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.”

“स्वातंत्र्याला भीक बोलणाऱ्यांचं देशासाठी योगदान काय?”

“मी आंबेडकरवादी असून मला महात्मा गांधी, सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे विचार पटत नाही. पण त्यांचे देशाच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यामध्ये योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्यावर कोणीही बोलणार असेल तर मी सहन करणार नाही. जे लोक आज स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे त्या लोकांचे देशासाठी काय योगदान आहे? या तिघांपैकी एकाने पुढे येऊन या प्रश्नाचं उत्तर द्यावं,” असं आव्हान लक्ष्मण माने यांनी तिघांना दिलं.

हेही वाचा : स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून समर्थन; म्हणाले…

“या विधानांमागे आरएसएस, त्यांच्यानुसारच कंगना आणि मोदी बोलत आहेत”

“जर मी किंवा इतर कोणी असं बोललो असतो, तर केव्हाच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता आणि जेलमध्ये टाकलं असतं. मात्र यामागे आरएसएस असून त्यानुसार ती अभिनेत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या ८ दिवसात कंगना रणौत, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी. अन्यथा विक्रम गोखले यांच्या पुण्यातील घराबाहेर सत्याग्रह करणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Laxman mane warn and demand apology to kangana ranaut vikram gokhale and avdhut gupte pbs

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या