टिळक चौकापासून बेलबाग चौक ते पुढे क्वार्टर गेट. लक्ष्मी रस्ता पुण्याच्या पश्चिम आणि पूर्व भागाला जोडतो. सिटी पोस्टाची जुनी दगडी इमारत. पुढे केदारी चौक. लहान-लहान दुकानांची गर्दी. सोन्या मारुती चौकापासून कपड्या-दागिन्यांची दुकाने कमी कमी होताना दिसतात. लोकव्यवहार बदलले, की बाजारपेठांचे रूप बदलते. आता पुण्याच्या अवतीभवती एक नवं पुणं आकाराला येत आहे. पण, आजूबाजूच्या सगळ्या भागांच्या गरजा पुरविणारी बाजारपेठ पुण्याच्या मध्यवर्ती भागातच आहे, लक्ष्मी रस्त्यावर.

या रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सोन्या-चांदीपासून नट-बोल्ट, बेकऱ्यांपर्यंत सारे काही नजरेस पडते. चालता चालता सहज नजरेस पडणाऱ्या लखलखीत जाहिराती नि जुने देखणे वाडे सहजच खिळवून ठेवतात. पण, इथल्या बाजारपेठेची बात काही औरच! आकाराने छोट्या दुकानांमध्येही कोट्यवधींची उलाढाल होते, तर कित्येक दालनांना शंभर-शंभर वर्षांचा वारसा आहे.

चहाशिवाय पुणेकरांचा दिवस सुरू होत नाही. पुण्यातले आद्य अमृततुल्य याच रस्त्यावर, सोन्या मारुती चौकात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. पाच पिढ्यांपासून चहाचा व्यवसाय करणारे विजय हुकूमचंद नरटेकर सांगतात, ‘साठच्या दशकात पानशेत धरण फुटलं. सिटी पोस्टापर्यंत पाणी आलं. त्यानंतर पोस्टाच्या पुढे पेठेचा विस्तार वाढला. पणजोबांनी या बाजूला दुकान घेतलं. ‘या भलत्या जागेत दुकान कसं चालणार’ असे अनेकांनी विचारलं. पण, आज लक्ष्मी रस्ता पुण्याच्या व्यापाराचा केंद्रबिंदू आहे. जवळच असलेल्या रविवार पेठेत सुईपासून माणसाच्या गरजेचं सगळं मिळतं.’

First Amruttulya in pune
आद्य अमृततुल्य. हे पुण्यातील पहिले अमृततुल्य आहे. अजूनही इथं फुलपात्र आणि ‘स्टीलच्या ग्लास’मध्ये चहा मिळतो. (फोटो- लोकसत्ता टीम)

‘सुरुवातीला हे मिठाईचं दुकान होतं. एक पैशाला दोन गुलाबजाम, एक चहा आणि एक मिरचीची भजी मिळायची. हल्ली मधुमेहाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे बिनसाखरेच्या चहाची भरपूर गिऱ्हाईकं असतात. सगळं मिळून दिवसाला ५०-६० लिटर दूध जातं,’ असं सांगायलाही नरटेकर विसरत नाहीत. त्यांच्या दुकानाशेजारी महापालिकेची शाळा आणि समोरच हुतात्मा बाबू गेनू दवाखाना. ‘सोन्या मारुती’नंतर पोटसुळ्या मारुती आणि शनि मंदिर. शनिवारी, तसेच हनुमान जयंतीला इथं गर्दी असते. बाजार म्हटला, की हरेक प्रकारचे लोक येणार. लोक आले, की त्यांच्या लहान-सहान गरजा नि गर्दीतून एक-दोन पैसे मिळवणारा अजून एक बाजार. पण, लक्ष्मी रस्त्यावरच्या व्यापाराला इतिहासाची मोठी किनार आहे.

महाराष्ट्राला भुरळ पाडणाऱ्या तमाशालाही या रस्त्याने आश्रय दिला. आर्यभूषण तमाशा थिएटर. पद्मश्री यमुनाबाई वाईकर इथं काही काळ राहत होत्या. तुकाराम खेडकर, तमाशासम्राट काळू-बाळू यांचे फड कायम असत. भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचा तमाशा फड आणि त्यांच्या फडातल्या तीन मुली. विठाबाई, केशरबाई आणि मनोरमा. या तिघींनी आपली कला आर्यभूषण थिएटरमध्ये सादर केली. १९३३ मध्ये अहमदशेठ तांबे यांनी हे थिएटर सुरू केले. आता त्यांची मुले हा वारसा चालवतात.

Aaryabhuhan theater
आर्यभूषण तमाशा थिएटर (फोटो- लोकसत्ता टीम)

पुण्यात समुद्र नाही, पण लक्ष्मी रस्त्यावर समुद्रातले ताजे मासेही मिळतात. डुल्या मारुती चौकातून पुढे आले, की पुण्यातला एकमेव मासळी बाजार दिसतो, गणेश पेठेत. आजूबाजूच्या परिसरातही इथूनच मासे जातात. ‘पहाटे पाचपासून बाजारातली लगबग सुरू होते. सुरमई, बांगडा, कोळंबी, बोंबलासाठी झुंबड उडते. कोळंबी-वाम-पापलेट-रावसलाही मागणी असते,’ गेल्या तीन पिढ्यांपासून मासळी बाजारात व्यवसाय करणारे राजू परदेशी सांगतात. ‘दररोज कोटींच्या घरात उलाढाल होते. माशांचे भाव रोज ठरतात. आपल्याकडे मासेमारी बंद असली, की कोलकाता-हावडा-जामनगरमधूनही ताजा माल येतो. गेल्या काही वर्षांत गर्दी वाढली, पण पायाभूत सुविधा नाहीत. बाजारात कसलीच जागा उरली नाही. मुख्य वास्तूचा पुनर्विकास सुरू आहे.’

Fish Market
गणेश पेठेतील मासळी बाजार (फोटो- लोकसत्ता टीम)

मासळी बाजारानंतर नाना पेठेतला प्रसिद्ध दुचाकी बाजार. नट-बोल्टपासून दुचाकीचे सगळे भाग इथल्या दुकानांमध्ये मिळतात. घाऊक विक्रीसाठी ही दुकाने प्रसिद्ध. त्यामुळे गिऱ्हाईकांची कायम गर्दी. दुकानाबाहेर थांबलेल्या मुलांमध्ये गिऱ्हाईक मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असते. कारागीर मात्र आपलं काम चोख करत असतात. संपूर्ण देशभरात या बाजाराची विशेष ओळख आहे. त्यामुळे स्पेअर पार्ट्सच्या शोधात राज्याबाहेरूनही अनेक जण लक्ष्मी रस्त्यावर येत असतात.

Nana Peth
नाना पेठ दुचाकी बाजार (फोटो- लोकसत्ता टीम)

वेगवेगळे बाजार नि त्या बाजारांच्या निमित्ताने लक्ष्मी रस्त्यावर कायम वर्दळ असते. त्यामुळे इथल्या चौका-चौकांत खाण्याची दुकाने व गाडे थाटलेले दिसतात. आताशा सोशल मीडियावर व्हायरल झालेली अप्पाची मिसळ असो, की कोल्हापुरी-पुणेरी मिसळीचे वेगवेगळे ठेले नि दालचा राइसच्या गाड्यांबरोबर लक्ष्मी रस्त्यावरचे जुने कॅफे आणि हॉटेलही प्रसिद्ध आहेत. व्हेज-नॉनव्हेजचे नाना प्रकार इथं मिळतात. कामगारांसाठी आणि कामासाठी आलेल्यांना परवडणारे जेवण म्हणून हमाल पंचायतीची ‘कष्टाची भाकर’ही या रस्त्यावर आहे.

लक्ष्मी रस्ता संपतो क्वार्टर गेट चौकात. स्वातंत्र्यापूर्वी गस्त घालण्यासाठी महत्त्वाची जागा म्हणून ब्रिटिशांच्या सैन्याची ‘क्वार्टर गार्ड’ चौकी इथं होती. त्यावरून या परिसराला ‘क्वार्टर गेट’ हे नाव पडलं. क्वार्टर गेटच्या अलीकडेच शंभर वर्षांहून अधिक काळ गोव्याची संस्कृती जपणारे ‘पूना गोअन इन्स्टिट्यूट’ (पीजीआय) आहे. ब्रिटिशांच्या काळात पुण्यात राहणाऱ्या गोमंतकीय लोकांसाठी ही संस्था स्थापन झाली. शेजारीच ‘पीजीआय’चे रेस्टॉरंट. खास गोवन, मालवणी पद्धतीच्या जेवणासाठी प्रसिद्ध. इथले मासे आजही कोकणातून येतात. तीस-चाळीस वर्षांपासून हे हॉटेल चालवणारे बाबा डिसूजा याच परिसरात वाढले. ते सांगतात, ‘परिसरातल्या काही इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. एक-दोन मजली वास्तूंच्या जागी मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. इथेच मागे प्रसिद्ध मॉडर्न बेकरी होती. जुनी बेकरी. बाबासाहेब देवकरांची. त्यांचा मिल्क ब्रेड काय क्लास होता! तसा ब्रेड आता मिळणारच नाही. आमच्या लहानपणी ‘मम्मी, मम्मी, मॉडर्न ब्रेड’ ही जाहिरात प्रत्येकाच्या तोंडी असायची. शेजारीच एरिअल बेकरी. तिथं खारी, टोस्ट, पफ. या दोन्ही बेकऱ्या आता बंद होऊन वीस वर्षे लोटली. पिढ्या बदलल्या. परिसर बदलला. बेकऱ्यांच्या जागी आता कार्पेटची दुकानं आली.’

Poona Goan Institute
पुणे गोअन इन्स्टिट्यूट (फोटो- लोकसत्ता टीम)

क्वार्टर गेट परिसरात इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव आजही काही प्रमाणात दिसतो. वृत्तपत्रांबरोबर विक्रीसाठी मांडलेली लाल-पिवळ्या-निळ्या रंगांची लॉटरीची दुकाने आणि कालिकतचे (आत्ताचे केरळमधील कोझिकोळे) प्रसिद्ध सुदर्शन चिट्स याच चौकात आहे. संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला कचरा, अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी, पार्किंगचा नि मोकळ्या जागेचा प्रश्न आहेच. पुण्यात सगळा विकास मध्यवर्ती भागातच झाल्याचे हे परिणाम. या वाढलेल्या पुण्याचा ताण लक्ष्मी रस्त्यावर फिरताना दिसतो. पण, टिळक चौकापासून क्वार्टर गेटपर्यंत लक्ष्मी रस्त्याच्या आजूबाजूला हिंदू-मुस्लिम-शीख अशा सगळ्याच जाती-धर्मांचे लोक या रस्त्यावर राहतात. हे लोक, त्यांचे लोकव्यवहार नि त्यांच्या घुसळणीतून लक्ष्मी रस्त्याची आपली अशी खास ओळख निर्माण झाली आहे. हा रस्ता खऱ्या अर्थाने पूर्वेला पश्चिमेशी जोडतो.

tushar.suryawanshi@expressindia.com