पुणे शहराच्या बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी (२७ मे) दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित राहणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, “यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२ चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.”

“यावेळी उद्यानकृषी क्रांतीच्या जनक आणि डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ डॉ. प्राजक्ता काळे यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दत्तमंदिराच्या १२५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे,” अशीही माहिती कदम जहागिरदार यांनी दिली.

हेही वाचा : भाजपाचे पुणे लक्ष्य: तीन महिन्यांत पंतप्रधानांचा दुसरा दौरा

या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, उप उत्सवप्रमुख युवराज गाडवे, ज्येष्ठ विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ. पराग काळकर, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.