स्थानिक संस्था कराबाबत (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला, तरी एलबीटीबाबत सुरू झालेल्या चर्चेमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मात्र परिणाम झाला आहे. गेल्या महिन्याचा एलबीटी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महापालिकेकडे चौऱ्याण्णव कोटी रुपये एलबीटीपोटी जमा झाले असून ही जमा नेहमीच्या तुलनेत दहा ते वीस कोटींनी कमी झाली आहे.
एलबीटीला मोठय़ा प्रमाणावर विरोध सुरू झाल्यामुळे शहरात एलबीटी ठेवायचा का पुन्हा जकात लागू करायची याचा निर्णय महापालिकेने घ्यावा, अशी सूचना राज्य शासनाने महापालिकांना केली आहे. या सूचनेमुळे एलबीटी बाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम एलबीटीच्या उत्पन्नावर झाला आहे. दर महिन्याच्या दिनांक २० पर्यंत गेल्या महिन्याचा एलबीटी जमा करणे अपेक्षित आहे. त्यानुसार २० मे पर्यंत एप्रिल महिन्याचा चौऱ्याण्णव कोटी रुपये एवढा एलबीटी महापालिकेकडे जमा झाला आहे. एलबीटीपोटी आतापर्यंत सरासरी दरमहा १०० ते १२० कोटी रुपये जमा होत होते. मात्र, एलबीटी रद्द होणार का कायम राहणार याबाबतचची चर्चा सुरू झाल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
एलबीटी भरण्यासाठीच्या अंतिम दोन दिवसांत शहरातील आठ हजारांहून अधिक व्यापाऱ्यांनी पन्नास कोटी रुपये एवढा एलबीटी भरला, तर शेवटच्या दिवशी; २० जून रोजी चार हजार नऊशे व्यापाऱ्यांनी अठ्ठावीस कोटी रुपये जमा केल्याचे सांगण्यात आले.