वाहनचालकांना सूचना देण्यासाठी एलईडी फलक | Loksatta

वाहनचालकांना सूचना देण्यासाठी एलईडी फलक

हा फलक सौरऊर्जेवर चालणारा आहे, त्यामुळे त्याला विजेची आवश्यकता भासत नाही.

वाहनचालकांना सूचना देण्यासाठी एलईडी फलक
वाहनचालकांना सूचना देण्यासाठी एलईडी फलक

वाहतुकीचे नियमभंग करण्यात पुणेकर वाहनचालक आघाडीवर आहेत. विरुद्ध दिशेने जाणे, भरधाव वाहने चालवणे, सिग्नल मोडणे अशा प्रकारचे नियम सर्रास मोडले जातात. ही परिस्थिती लक्षात घेऊन वाहनचालकांना सूचना देण्यासाठी वाहतूक शाखेने प्रायोगिक तत्त्वावर फग्र्युसन रस्त्यावर एलईडी फलक बसवला आहे.

फग्र्युसन रस्त्यावर गुरुवारी (३० मार्च) रात्रीपासून एलडीई फलक कार्यान्वित झाला. या फलकाच्या माध्यमातून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच वाहनचालकांना सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते म्हणाले, की सध्या मुंबई वाहतूक पोलिसांकडे अशा प्रकारचे फलक आहेत. मध्यंतरी तेथील एलईडी फलक पाहण्यात आला. त्यानंतर अशा प्रकारचा एक फलक पुण्यातही बसवण्याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. मुंबईस्थित अ‍ॅडोर कंपनीने हा फलक तयार केला आहे. त्यांनी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेला अशा प्रकारचा एक फलक विनामूल्य वापरायला दिला आहे.

हा फलक सौरऊर्जेवर चालणारा आहे, त्यामुळे त्याला विजेची आवश्यकता भासत नाही. विशेष म्हणजे हा फलक हलवता येतो, त्यामुळे गर्दीच्या रस्त्यावर हा फलक त्वरित हलवणे शक्य होते. समजा, एखाद्या प्रमुख रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करायचे असेल तर हा फलक तेथे नेणे शक्य होईल. प्रायोगिक तत्त्वावर हा फलक फग्र्युसन रस्त्यावर बसवण्यात आला आहे. आकर्षक रंगसंगतीमुळे हा फलक त्वरित वाहनचालकांच्या निदर्शनास येतो. फलकावरील सूचना बदलण्याची सुविधा आहे, त्यामुळे प्रत्येक मिनिटाला सूचना बदलल्या जातात. भरधाव वाहने चालवू नका, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, विरुद्ध दिशेने जाण्यास मनाई, अशा प्रकारच्या सूचना फलकांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

हा फलक सौरऊर्जेवर सुरू राहतो. दिवसभर हा फलक सुरू राहिल्यास काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा फलक कार्यान्वित करण्यासाठी त्याला चार्जिगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा फलक बसवण्यात आला आहे. फलक हे माध्यम आहे. वाहनचालकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळल्यास वाहतुकीची समस्या सुटण्यास काहीअंशी मदत होईल, असे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

नियम मोडण्यात पुणेकर वाहनचालक अग्रेसर

वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी पोलिसांकडून फलक बसवण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाहनचालकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, मात्र वाहतुकीचे नियम धुडकावण्यासाठी असतात, अशा आर्विभावात पुणेकर वाहनचालकांकडून सर्रास नियमभंग केले जात आहेत. कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही वाहनचालकांमध्ये फारशी सुधारणा झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2017 at 03:16 IST
Next Story
पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या सीमा सावळे बिनविरोध