पुणे : विश्वातील रहस्यांचा वेध घेण्यासाठी जगातील सर्वांत मोठी खगोल निरीक्षण मोहीम अधिकृतरीत्या सुरू करण्यात आली आहे. ‘लेगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’ (एलएसएसटी) असे या मोहिमेचे नाव असून, त्या अंतर्गत चिलीतील रुबिन वेधशाळेद्वारे दहा वर्षे दर ४० सेकंदांनी नवे छायाचित्र टिपून विश्वाचा आजवरचा सर्वांत व्यापक आणि उच्च-गुणवत्तेचा ‘टाइम-लॅप्स’ तयार करणार आहे. या महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय प्रकल्पात पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्रासह (आयुका) भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग आहे.
‘आयुका’ने या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. जगातील सर्वांत मोठ्या ३,२०० मेगापिक्सेल डिजिटल कॅमेऱ्याच्या साहाय्याने पुढील दहा वर्षे दक्षिण गोलार्धातील संपूर्ण आकाशाचे दर काही दिवसांनी निरीक्षण केले जाणार आहे. या मोहिमेदरम्यान दररोज सुमारे १० टेराबाइट विदा संकलित केला जाणार आहे. सर्वेक्षणाच्या सुरुवातीच्या चाचणी टप्प्यातच ११ हजारांहून अधिक नवीन लघुग्रहांचा शोध लागला आहे. दहा वर्षांच्या अखेरीस अब्जावधी खगोलीय वस्तूंची आणि अधिक निरीक्षणांचा विदासाठा शास्त्रज्ञांना मिळणार आहे.
या सर्वांत मोठ्या आकाश निरीक्षणाद्वारे या मोहिमेमुळे कृष्ण पदार्थ (डार्क मॅटर), कृष्ण ऊर्जा (डार्क एनर्जी), ताऱ्यांचा स्फोट (सुपरनोव्हा), कृष्णविवरे, अब्जावधी दीर्घिका, लघुग्रह, धूमकेतू आणि विश्वाच्या उत्क्रांतीशी संबंधित अनेक रहस्यांच्या अभ्यासासाठी प्रचंड प्रमाणात विदा निर्माण होणार आहे. रुबिन-आयुका कार्यक्रम व्यवस्थापक प्रा. सुहृद मोरे म्हणाले, ‘रुबिन एलएसएसटीमुळे खगोलशास्त्रातील नवे पर्व सुरू होत आहे. सूर्यमालेची निर्मिती, स्फोट पावणारे तारे, कृष्णविवरे, आकाशाच्या निम्म्या भागातील कृष्ण पदार्थाचा नकाशा आणि भविष्यात विश्वाची उत्क्रांती कशी होईल, अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी या सर्वेक्षणातून मिळणार आहे.
‘रुबिन एलएसएसटीमुळे १० हजारांहून अधिक गुरुत्वीय भिंगांचा (ग्रॅव्हिटेशनल लेन्स) शोध लागू शकतो. गुरुत्वीय भिंगांमुळे ‘सुपरनोव्हा’ आणि ‘किलोनोव्हा’ अशा दुर्मीळ घटना अधिक तेजस्वी दिसतात. त्याच घटनांचे अनेकदा निरीक्षण करता येते. या माध्यमातून विश्वाचे वय आणि त्याच्या विस्ताराचा वेग अधिक अचूकपणे मोजणे शक्य होईल,’ असे ‘एलएसएसटी’ स्ट्राँग लेन्सिंग सायन्स कोलॅबोरेशनच्या सहअध्यक्ष डॉ. अनुप्रिता मोरे यांनी नमूद केले.

‘रुबिनच्या माध्यमातून अत्यंत सखोल प्रतिमा मिळणार आहेत. त्यामुळे २० अब्ज दीर्घिकांचा अभ्यास करता येईल. प्रत्येक दीर्घिकेची निर्मिती आणि उत्क्रांतीचा इतिहास समजून घेता येणार आहे. पुढील दशक खगोलशास्त्रातील संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे,’ असे गॅलेक्सीज सायन्स कोलॅबोरेशनचे प्रा. योगेश वाडदेकर यांनी सांगितले.
