उन्हाळ्यामुळे सरबत, रसवंतीगृहचालकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. लिंबांच्या गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने संत्री आणि द्राक्षांच्या दरात वीस टक्कय़ांनी वाढ झाली आहे. आवक वाढल्याने पपईचे दर उतरले आहेत.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमघील फळबाजारात लिंबे तीन ते चार गोणी, अननस सात ट्रक, कर्नाटकातून आठ ते दहा हजार पेटी आंबा, मोसंबी पन्नास टन, संत्री पन्नास टन, द्राक्षे तीस ते चाळीस टन, डाळिंब तीस ते पस्तीस टन, पपई बारा ते पंधरा टेम्पो, चिकू दोन हजार गोणी, कलिंगड तीस ते चाळीस टेम्पो, खरबूज पंचवीस ते तीस टेम्पो, पेरू दोन टन अशी आवक झाली.

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी कोथिंबिरीच्या दीड लाख जुडींची आवक झाली. मेथीची आवक कमी झाली आहे. मेथीच्या आवक तीस हजार जुडय़ांची आवक झाली आहे. करडई, चुका, मुळा आणि पुदिन्याच्या भावात वीस टक्क्य़ांनी घट झाली आहे.

मटार, घेवडा, कोबीचे दर वाढले

मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला बाजारात परराज्य तसेच स्थानिक भागातून होणारी आवक कमी झाल्याने मटार, बीट, गाजर, कोबी, घेवडय़ाच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी राज्य आणि परराज्यातून मार्केट यार्डात एकशेसाठ गाडय़ांमधून भाजीपाल्याची आवक झाली. हिमाचल प्रदेशातून एक ट्रक मटार, जयपूरमधून चार ट्रक गाजर, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून पाच ते सहा टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकातून चौदा ते पंधरा टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून पाच ते सहा टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि कर्नाटकातून पाच ते सहा टेम्पो कोबी अशी परराज्यातून आवक झाल्याची माहिती प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

मध्य प्रदेश आणि गुजरातमधून पाच ते साडेपाच हजार गोणी लसणाची आवक झाली. परराज्य तसेच स्थानिक भागातून चाळीस ट्रक बटाटय़ाची आवक झाली.