पुणे : वेळेपूर्वीच उन्हाळ्यात लिंबाची मोठ्या प्रमाणावर तोड करून शेतकऱ्यांनी बाजरात लिंबे विक्रीस पाठविली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात घाऊक बाजारात लिंबाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. पावसाळ्यात लिंबाचा दर कमी असतो. मात्र, तुटवडा जाणवत असल्याने लिंबाचा दर वाढला आहे. किरकोळ बाजारात एका लिंबूसाठी १० रुपये मोजावे लागत असून, ४० ते ५० रुपयांत सहा लिंबांची विक्री केली जात आहे.
‘पावसाळ्यात लिंबाला फारशी मागणी नसते, तसेच दरही कमी असतो. लिंबाला सर्वाधिक मागणी उन्हाळ्यात असते. उन्हाळ्यात घरगुती ग्राहक, सरबतविक्रेते, रसवंती गृहचालकांकडून मागणी वाढल्यानंतर बाजारात लिंबाचा तुटवडा जाणवतो.
‘लिंबाची लागवड सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, तसेच अहिल्यानगरमधील राशिन परिसरात केली जाते. उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने लिंबाच्या लागवडीवर परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचा दर तेजीत असतो’, असे श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.
‘उन्हाळ्यात शेवटच्या टप्प्यात लिंबाची लागवड केली जाते. ती लिंबे जुलै-ऑगस्टमध्ये काढणीस येतात. मात्र, यंदा लिंबूउत्पादकांनी कच्च्या लिंबाची तोड केली. त्यामुळे बाजारात सध्या लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. रविवारी (७ सप्टेंबर) मार्केट यार्डातील फळबाजारात सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातून हजार ते १२०० गोणी लिंबाची आवक झाली. एका गोणीत आकारमानानुसार ३०० ते ४०० लिंबे असतात. श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. त्यामुळे लिंबाला मागणी कमी असते. गणेशोत्सवात हाॅटेल व्यावसायिकांकडून लिंबाला मागणी वाढेल. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत लिंबाची आवक कमी असल्याने दरवाढ झाली,’ असे त्यांनी नमूद केले.
दरवाढीची झळ लोणचे उत्पादकांना
जुलै-ऑगस्ट, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लिंबाला मागणी कमी असते. लिंबाचा दर कमी असतो. त्यामुळे लोणचे उत्पादक थंडीत, पावसाळ्यात लिंबूखरेदी करतात. यंदा पावसाळ्यातही लिंबू महागल्याने त्याची झळ लोणचे उत्पादकांना बसली आहे.
गणेशोत्सवानंतर लिंबाच्या मागणीत वाढ होऊन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच लिंबाची तोड केल्याने सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. – रोहन जाधव, लिंबू व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
