नारायणगाव : बिबट्यांचा वावर वाढला असून नारायणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठरा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. वन विभागाने ड्रोनद्वारे केलेल्या पाहणीत वारुळवाडी येथे तीन बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. हिवरे तर्फे नारायणगाव, वारुळवाडी आणि गुंजाळवाडी या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १७ शेळ्या ठार झाल्या आहेत. नारायणगाव परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. रविवारी रात्री आठ वाजता घराबाहेर फिरत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तनिष परदेशी (वय १८) हा जखमी झाला आहे. वन विभागाने ड्रोनद्वारे पाहणी केली असून, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर परिसरात असलेल्या उसाच्या शेतात तीन बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहेत.
वारूळवाडी येथे जाळी तोडून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला. उमेश अवचट, तुकाराम निंबारकर यांच्या चार शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. हिवरे तर्फे नारायणगाव येथेही सुशीला यशवंत वाघ यांच्या १३ शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहेत.
तीन श्वानांच्या शार्यामुळे बिबट्याची माघार
गुंजाळवाडी येथील शेतकरी अशोक विठ्ठल दरेकर यांच्या बंगल्यासमोरील शेतातून कंपाऊंडवरून चढून शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला तीन पाळीव श्वानांनी पळवून लावल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. दरेकर यांचे तीन पाळीव श्वान असून, त्यांनी दाखविलेले शौर्य ‘सीसीटीव्ही’ मध्ये चित्रीत झाले आहे.
वारूळवाडी- गुंजाळवाडी रस्त्यालगत अशोक दरेकर यांचा बंगला आहे. शनिवारी मध्यरात्री श्वानाची शिकार करण्यासाठी बिबट्या आला. बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यावर तिन्ही श्वानांनी हल्ला केला. श्वानांनी हल्ला केल्याचे पाहून बिबट्या भिंतीवरून खाली उतरून पसार झाला. या घटनेनंतर जवळच असलेल्या गुंजाळवाडी येथील वायकर मळ्यातील बाळू बबन वायकर यांची शेळी बिबट्याने फस्त केली. घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी भेट देऊन पिंजरा लावला.
वन विभागाकडून नारायणगाव परिसरात १८ पिंजरे
बिबट्यांचे हल्ले वाढले असल्याने वन विभागाने नारायणगाव परिसरात १८ पिंजरे लावले आहेत. याव्यतिरिक्त ‘एआय’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ड्रोनद्वारे निरीक्षण आणि रेस्क्यू टीम सदस्यांसह टेहळणी मोहीम, जनजागृती आदी उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली.

