पुणे : पहाटेच्या वेळी मोटारीतून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक रस्त्याच्या कडेला बिबट्याचे दर्शन होते. सगळ्यांची पाचावर धारण बसते. क्षणार्धातच बिबट्या सीमा भिंतीवरून आतमध्ये उडी मारून दिसेनासा होतो. हे ठिकाण असते चाकण एमआयडीसीतील जागतिक पातळीवरील आघाडीची वाहननिर्मिती कंपनी मर्सिडीज बेंझ. तिथून सुरू होतो त्या बिबट्याला पकडण्याचा थरारक प्रवास.
चाकण औद्योगिक क्षेत्रात मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या उत्पादन प्रकल्पाच्या आवारात शुक्रवारी पहाटे हा बिबट्या दिसला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. कंपनीच्या व्यवस्थापनाने तातडीने अंतर्गत सुरक्षेसाठी पावले उचलली. तसेच वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे पथक लगेचच कंपनीत दाखल झाले. या पथकाने कंपनीच्या आवाराची तपासणी सुरू केली. खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीचे प्रॉडक्शन हाऊस पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या.
मर्सिडीज बेंझसारख्या अवाढव्य प्रकल्पात बिबट्या शिरल्याने त्याला शोधणे कठीण होते. त्यामुळे त्याला जेरबंद करणे अत्यंत आव्हानात्मक बनले होते. कंपनीचा विस्तार मोठा असल्याने बिबट्या नेमका कुठे लपला आहे, हे शोधण्यासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागली. कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या आवारातच असल्याचे निष्पन्न झाले. कंपनीतील कार्यशाळेच्या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यामुळे त्याठिकाणी पाच पिंजरे लावण्यात आले. अखेर दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर भुकेने व्याकूळ झालेला बिबट्या सावजाच्या शोधात असताना एका पिंजऱ्यात सोमवारी जेरबंद झाला. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला नर असून त्याचे वय अंदाजे ३.५ ते ४ वर्षे आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाइल्डलाईफ एसओएस यांच्यामध्ये चांगला समन्वय पाहायला मिळाला. दोन दिवसांच्या तणावानंतर बिबट्या जेरबंद झाल्याने कंपनीतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
ही मोहीम वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वनपाल इंदलकर, जगताप, पिसाळ आणि चाकण वनविभागाचे सर्व कर्मचारी, माणिक डोह रेस्क्यू सेंटरचे डॉ. महेंद्र ढोरे, डॉ. अविनाश विसलकर आणि बावधन रेस्क्यू सेंटरचे डॉ. नचिकेत उत्पात, नेहा पंचमिया व त्यांचे पथक तसेच म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाले आणि मर्सिडीज बेंझचे अधिकारी सारंग जोशी आणि व्यंकटेश कुलकर्णी यांचेही सहकार्य लाभले.
