जुन्नर तालुक्यातील डिंगोरे व खामुंडी गावांमध्ये नागरिकांसमोर येऊन थेट घरातूनच मुलांना बिबटय़ाने उचलून नेल्याचे वर्तन अनैसर्गिक असल्याचे वन्यजीवतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या दोन्ही घटनांमध्ये बिबटय़ाने खाद्य म्हणून बालकांवर हल्ला केला नसल्याचे आढळून असून, त्यामुळे या घटनांमधून बिबटय़ांच्या वर्तनाचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच, बिबटय़ाकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यावर तात्पुरता व कायमचे उपाय करण्यासाठी चार तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमण्यात आली आहे.
जुन्नर तालुक्यात गेल्या दीड वर्षांत बिबटय़ाने माणसांवर हल्ला केल्याच्या एकूण अकरा घटना घडल्या. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर आठ व्यक्ती जखमी आहेत. या काळात बिबटय़ाने ४३ पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये बिबटय़ाने डिंगोरे गावातील साई संतोष मंडलीक (वय ४) आणि प्रविण देवराम दुधवडे (वय ५) या दोघांना कुटुंबासमोर घरातून उचलून नेले. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाकडून डिंगोरे गावात सध्या आठ पिंजरे लावण्यात आले आहेत. त्यातील एका पिंजऱ्यात साडेचार वर्षांची बिबटय़ाची मादी अडकली. तर खामुंडी येथे एक पिंजरा लावण्यात आला आहे.
याबाबत माणिकडोह बिबटय़ा निवारण केंद्राचे डॉक्टर अजय देशमुख यांनी सांगितले की, बिबटय़ा हा मांजर कुळातील प्राणी असून तो स्वत: खूप भित्रा आहे. बिबटय़ा पहिल्यापासूनच मानवी वस्तीच्या जवळ राहणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. जुन्नर वनक्षेत्रपालच्या हद्दीतील मढ ते नारायणगाव हे बिबटय़ाप्रवण क्षेत्र आहे. बिबटय़ाने यापूर्वी पाळीव प्राणी व इतर प्राण्यांची शिकार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. बिबटय़ाने क्वचितप्रसंगीच जीवाच्या भीतीने माणसावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या दोन घटनांमध्ये बिबटय़ाचे कृत्य अनैसर्गिक असल्याचे दिसून येत आहे. या दोन घटनांमध्ये बिबटय़ाने बालकांना घरात माणसांसमोरून उचलून नेले. त्याने हे हल्ले अन्नासाठी केले नाहीत. मानवी वस्ती वाढत असून शेतांमध्ये घरे बांधण्याचे प्रमाण वाढले आहे.

बिबटय़ा हा फारच भित्रा असून माणसाला पाहिले तरी तो पळून जातात. डिंगोरे गावात घराबाहेर शेळी, कुत्रे असतानादेखील बिबटय़ाने मुलाला उचलून नेले. ही घटना अनैसर्गिक आहे. मात्र, या घटनांमागील कारण निश्चित सांगता येत नाही. त्यांनी असे का केले हे शोधणे फारच अवघड आहे, असे वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांनी सांगितले.

अभ्यासासाठी चौघांची समिती
बिबटय़ाप्रवण क्षेत्रात नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर तात्पुरता आणि कायमचा उपाय काय करावा लागेल, याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून चार तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये विद्या अत्रेय, अनुज खरे, मनोज ओस्वाल आणि वनविभागाचे अधिकारी असणार आहेत. त्याबरोबरच वनविभागासाठी प्रशिक्षित पथकाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही. ए. धोकटे यांनी दिली.

रात्रभर वीज, बंदिस्त गोठे आणि स्वच्छतागृह
बिबटय़ा प्रवणक्षेत्र घोषित करून या परिसरात रात्रभर वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतागृह आणि बंदिस्त गोठा बांधून देण्याबद्दल नुकतीच जिल्हाधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

नागरिकांचा वनविभागावर रोष
बिबटय़ाच्या वाढलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांनी वनविभागावर रोष व्यक्त केला आहे. ‘वनविभागाचे अधिकारी कधी सुद्धा फिरकत नाहीत. पंधरा दिवसांमध्ये दोन मुले ठार झाल्यानंतर वनविभागाला जाग आली आहे. रात्री बाहेर पडू नका म्हणून अधिकारी सांगतात. मग, काय शेती करणे सोडून द्यायचे का? तीन दिवसच फक्त दिवसभर वीज असते. त्यामुळे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडावे लागते. वनविभागाने बिबटय़ांकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत काहीतरी उपाययोजना कराव्या. अन्यथा नागरिक शांत बसणार नाहीत,’’ असे िडगोरे गावचे शेतकरी योगेश लोहटे यांनी सांगितले.