नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी ( ओतूर ) येथील जनता कॉलनी असलेल्या भरवस्तीत लहान मुले खेळत असताना बिबट्याने हल्ला करून गणेश नवनाथ विटेकर यांची शेळी उचलून नेऊन ठार केली आहे . या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटने नंतर ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विश्वनाथ बेले व इतर कर्मचारी यांच्या पथकांनी पाहणी करून पंचनामा केला.

सोमवारी रात्री घडलेल्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या शेळीवर हल्ला करत असताना परिसरात काही लहान मुले खेळत होती. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर असलेल्या डुंबरवाडी हद्दीत छोट्या पुलावरून हळुवार बिबट्या चालत असल्याचे आढळून आले आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.

डुंबरवाडी येथील जनता कॉलनी नजीकच्या वाड्यावस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याने या परिसरात पिंजरे लावण्याची मागणी सरपंच शीतल गोरे यांनी वन विभागाकडे केली आहे.