पुणे : जुन्नर, शिरूर, आंबेगाव भागात बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष चिघळला असतानाच आता भोर तालुक्यातील नसरापूर, जांभळी गावांमध्येही रात्रीनंतर फिरणाऱ्या बिबट्यामुळे गावकऱ्यांमध्ये भयाचे वातावरण आहे. अनेकांना घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात वन विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
भोर, वेल्हा परिसरातील वनक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. जंगलात फिरताना काहींना यापूर्वी बिबटे दिसले आहेत. मात्र, शिरूर, आंबेगाव, जुन्नर भागात सातत्याने बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना पुढे येत आहेत. ऊसकापणी सुरू झाल्यापासून गेल्या महिनाभरात बिबट्याकडून झालेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे मृत्यू झाल्याने त्याची दहशत लहान-मोठ्या गावांमधील नागरिकांना वाटू लागली आहे. या समस्येवर प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही, तर आपल्या भागातही जुन्नरसारखी परिस्थिती उद्भवेल, अशी भीती भोर तालुक्यातील नागरिकांना वाटत आहे.
‘सह्याद्रीच्या डोंगरकुशीत असलेल्या भोर, वेल्हे तालुक्यांच्या सभोवताली समृद्ध वन क्षेत्र असल्याने अनेक वर्षांपासून बिबट्यांचा अधिवास आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या वस्त्यांमध्ये आल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. भटक्या जनावरांची तो शिकार करतो आहे. त्यामुळे आम्ही गावागावांत जाऊन जनजागृती करत आहोत. गावकऱ्यांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे. बिबट्यांपासून स्वसंरक्षणाचे उपाय त्यांना सांगितले आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी दिलेले निवेदन मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवले आहे’ ,असे पांडुरंग गुट्टे, वनरक्षक, नसरापूर यांनी सांगितले.
जांभळी गावाच्या सरपंच प्रियांका कोळपे म्हणाल्या, ‘जांभळीतील केळवडे, वीरवाडी आणि आजूबाजूच्या भागात शेतात, वस्त्यांजवळ बिबट्याचा वावर वाढला आहे. गावकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून एका मादीला दोन पिल्लांसह फिरताना पाहिले आहे. अनेकांच्या घराबाहेर असलेल्या पाळीव श्वानांना बिबट्याने पळवून फस्त केले आहे. गावातील पाराजवळ बिबट्या फिरतो आहे. रात्रीबरोबरच सकाळी सहा वाजता काही गावकऱ्यांना बिबट्या दिसला आहे. बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही वन विभागाला निवेदन दिले आहे.
‘दुपारी मुले शाळेतून एकटी चालत येतात. नोकरीसाठी पुण्याला जाणारे अनेकजण रात्री उशिरा घरी येतात. शेतामध्ये सध्या भात कापणीचे काम सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत लोक काम करत आहेत, अशा वेळी बिबट्या समोर आला तर काय करायचे ही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात आहे. अजित कोळपे, अनिकेत आंबवले, संतोष कोळपे, महेश कोळपे गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याला जेरबंद करण्याच्या उद्देशातून पिंजरा लावण्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा करत आहेत,’ असे कोळपे यांनी सांगितले.
