पुणे : करोना सावटानंतर यंदा मोठय़ा प्रमाणावर राखी पौर्णिमा साजरी होणार असली तरी नेमक्या किती राख्या लागतील याचा अंदाज व्यावसायिकांना न आल्याने राख्यांची कमतरता जाणवत आहे. राख्यांना गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मागणी वाढली आहे. राखी निर्मिती व्यावसायिकांकडून अपुरा पुरवठा झाल्याने किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना मुंबई, कोलकाता, सूरत, अहमदाबाद येथील राखी निर्मिती व्यावसायिकांकडून राखी खरेदी करावी लागली.  किरकोळ बाजारात विविध प्रकारच्या एका राखीची किंमत दहा ते दीडशे रुपयांपर्यंत असून दोन वर्षांच्या तुलनेत यंदा राख्यांना मागणी वाढली असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले.

गेली दोन वर्ष राखी पौर्णिमेच्या सणावर करोनाचे सावट होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी खरेदीची लगबग सुरू झाली असून  येत्या गुरुवारी (११ ऑगस्ट) राखी पौर्णिमा आहे. राखी निर्मिती कोलकाता, अहमदाबाद, सूरत तसेच मुंबईत मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या भागातील कारागीर वेगवेगळय़ा प्रकारच्या राख्या तयार करतात. गेल्या काही वर्षांपासून फॅन्सी प्रकारातील राख्यांना मागणी वाढली असून आकर्षक रंगसंगतीच्या एका राखीची किंमत दहा ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. यंदा मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

निर्मिती कमी होण्यामागची कारणे

गेली दोन वर्षे राखी पौर्णिमेच्या सणावर करोनाचे सावट होते. त्यामुळे राखी निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांनी यंदा राख्यांची निर्मिती कमी प्रमाणावर केली. पुण्यातील कापडगंजमधील बाजारपेठेतून पश्चिम महाराष्ट्रात राख्या विक्रीस पाठविल्या जातात. हे विक्रेते मुंबईतील काळबादेवी, बोरीवली भागातील राखी निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांकडून, तसेच कोलकाता, अहमदाबाद, सूरत येथील व्यावसायिकांकडून राखी खरेदी करतात. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात मुंबईसह परराज्यातील राखी निर्मिती व्यावसायिकांकडून राखी खरेदीबाबतची आगाऊ नोंदणी केली जाते. यंदा मुंबईसह परराज्यातील राखी निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांना राखी निर्मितीचा अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे बाजारात राख्यांचा तुटवडा निर्माण झाला, असे कापडगंज भागातील मल्हार राखी विक्री केंद्राचे संजय कोळी यांनी नमूद केले.