scorecardresearch

लेटर बॉम्ब: IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली? पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल

हे पत्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय.

पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संबंधी असलेल्या लेटर बॉम्बची जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्रामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला असून ते थेट मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. यात चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा समावेश आहे. याप्रकरणी कृष्ण प्रकाश यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला आहे. 

सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं बोललं जातं आहे. डोंगरे यांचं अर्जदार म्हणून नाव आहे. प्रत्यक्षात मात्र हे पत्र आपण लिहिलं नाही, असा दावा डोंगरे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना केला आहे. तसेच यावर त्यांनी अधिक बोलण्यास टाळलं आहे.

दरम्यान, “संबंधित पत्र मी लिहिलेच नाही, असं सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबावर ठाम आहे”, असं व्हायरल पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या कथित पत्रात नेमकं काय म्हटलंय?

अर्जदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले. पण पदाने कनिष्ठ असल्याने सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे. चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत. या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते.  आत्तापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे. यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वैक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळं मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास दिललेला नाही. त्यामुळं आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला भीती वाटत असून आपल्याकडून सुरक्षितता मिळावी ही अपेक्षा आहे. सदर अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलाच नाही अस सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबदार ठाम आहे, असं या व्हायरल पत्रात लिहिलेलं आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेले व्हायरल पत्र

हेही वाचा : २०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या व्हायरल पत्रावर IPS कृष्ण प्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पत्रात महत्वाचे आरोप काय आहेत?

–  सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन  कोटी रुपये घेण्यात आले.

– पिंपरीतील एका बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले.

-आयुक्तांच्या वर्षपूर्तीनिमित राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा खर्च हिंजवडी आणि मावळ मधील बांधकाम व्यवसायिकाने केला होता.

-राष्ट्रवादीच्या संबंधित असलेल्या स्पर्श घोटाळ्या प्रकरणी एका पत्रकाराला लाखो रुपये देण्यास कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

दरम्यान, या व्हायरल पत्रानंतर पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. या पत्रातील आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनने कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Letter viral of claiming 200 crore extortion for ips krishna prakash in pimpri chinchwad kjp 91 hrc

ताज्या बातम्या