वाहतूक नियमनासाठी ग्रामीण पोलिसांना ‘एलआयसी’ ने दिला मदतीचा हात

वाहनांच्या संख्येमुळे विविध बाबतीत पोलिसांना मदत करण्याच्या आवाहनाला ‘एलआयसी’ने साद दिली आहे. ग्रामीण पोलिसांना वाहतूक नियमनासाठी ‘एलआयसी’कडून पन्नास लोखंडी बॅरिकेट देण्यात आले.

पुणे जिल्ह्य़ामधील विविध प्रेक्षणीय ठिकाणे व वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे विविध बाबतीत पोलिसांना मदत करण्याच्या आवाहनाला ‘एलआयसी’ने साद दिली आहे. ग्रामीण पोलिसांना वाहतूक नियमनासाठी ‘एलआयसी’कडून पन्नास लोखंडी बॅरिकेट देण्यात आले.
पुणे जिल्ह्य़ामध्ये शहरीकरण वाढते आहे. औद्योगिकीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. जिल्ह्य़ाची ऐतिहासिक, धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची पाश्र्वभूमी लक्षात घेता भीमाशंकर, जेजुरी, रांजणगाव, मोरगाव त्याचप्रमाणे लोणावळा, खंडाळा, ताम्हीणी घाट या भागात मोठय़ा प्रमाणावर नागरिक येत असतात. गहुंजे व बालेवाडी यासारख्या मैदानांमुळे त्या ठिकाणी होणारी प्रेक्षकांची गर्दी त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. पोलिसांचे मनुष्यबळही अपुरे आहे. या सर्वातून काही तोडगा काढण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी औद्योगिक वसाहती व अनेक कंपन्यांना सहकार्याबाबत आवाहन केले होते.
पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला ‘एलआयसी’ने प्रतिसाद दिला. ‘एलआयसी’च्या शिवाजीनगर कार्यालयातील विभागीय व्यवस्थापक ए. पी. कुलकर्णी, विपणन अधिकारी व्ही. पिल्ले व सुबन दास यांच्या पुढाकाराने ग्रामीण पोलिसांना पन्नास लोखंडी बॅरिकेट देण्यात आले. ‘एलआयसी’कडून करण्यात आलेल्या या सहकार्याबद्दल लोहिया यांनी त्यांचे आभार मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lic giving helping hand to traffic police