४० कारखान्यांना गाळप परवाने नाकारले

राज्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या गाळप हंगामाला दसऱ्याच्या मुहूर्तावर (१५ ऑक्टोबर) सुरुवात झाली.

दिवाळीनंतर व्याजासह एफआरपी वसूल करण्याचा इशारा

पुणे : राज्यातील ४० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची रास्त व किफायतशीर रक्कम (एफआरपी) अद्याप पूर्णपणे दिलेली नसल्याने या कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामाचा परवाना नाकारण्यात आला. तसेच संबंधित कारखान्यांनी दिवाळीपर्यंत एफआरपी न दिल्यास त्यानंतर व्याजासह एफआरपी वसूल करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.

राज्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या गाळप हंगामाला दसऱ्याच्या मुहूर्तावर (१५ ऑक्टोबर) सुरुवात झाली. यंदा १९४ कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली. आतापर्यंत ५४ कारखान्यांत गाळप सुरू झाले आहे. मात्र ४० कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.

गेल्या गाळप हंगामात १५४ कारखान्यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १०० टक्के एफआरपी दिली. चालू गाळप हंगामात आतापर्यंत ५४ साखर कारखाने सुरू झाले आहेत. अनेक कारखान्याच्या संचालकांनी आर्थिक अडचणींमुळे तसेच तांत्रिक दुरुस्तीमुळे गाळप हंगामास सुरुवात केलेली नसून येत्या आठवडाभरात उर्वरित कारखान्यांमधील गाळप हंगामास सुरुवात करण्यात येईल, असे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गेल्या गाळप हंगामातील ४० कारखान्यांनी शेतकऱ्यांची ३०० कोटी (एक टक्का) एफआरपी देणे  बाकी आहे. या  कारखान्यांनी  ९० टक्क्यांहून अधिक एफआरपी दिली असून शिल्लक  दिवाळीपर्यंत देणे बंधनकारक आहे. तसेच जोपर्यंत संपूर्ण एफआरपी दिली जात नाही, तोपर्यंत नवीन गाळप हंगामास परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांना सूचित करण्यात आले आहे, असे साखर आयुक्तालयातील सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी स्पष्ट केले.

दिवाळीनंतर व्याजासह…

गेल्या हंगामातील थकीत एफआरपी दिवाळीपर्यंत देण्याबाबत कारखान्यांना कळवण्यात आले आहे. त्यानंतर व्याजासहित एफआरपी वसूल करण्यात येणार आहे. कारखान्यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना एफआरपी देऊ केली नाही, तर पुढील दिवसाप्रमाणे त्यांच्याकडून एफआरपी आणि त्यावरील व्याज अशी रक्कम वसूल करण्यात येईल. शिल्लक एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देताच गाळप परवाना तत्काळ देण्यात येणार असल्याचेही शेळके यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Licences of 40 sugar mills on hold over farmers dues in maharashtra zws

ताज्या बातम्या