पुणे : शहराच्या हद्दीत प्रमुख रस्त्यांवर डंपर, ट्रक, मिक्सर अशा अवजड वाहनांना बंदी असतानाही ही वाहने सर्रास रस्त्यांवरून धावत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, गेल्या वर्षी शहरात ३३४ प्राणांतिक अपघात (फेटल ॲक्सिडेंट) होऊन ३४५ जणांचा मृत्यू, तर यंदा जून महिनाअखेरीपर्यंत १४० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अपघातास जबाबदार ठरलेल्या अवजड वाहनांचा परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच, अपघातास कारणीभूत ठरलेल्या गेल्या पाच वर्षांतील अवजड वाहनांची माहिती संकलित करून ती वाहने जप्त करण्यात येणार आहेत.

शहरातील गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर डंपर, ट्रक, मिक्सर अशा अवजड वाहनांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही सर्रास बंदी आदेश धुडकावून अवजड वाहने शहरात येतात. गेल्या आठवड्यात सिंहगड रोड परिसरातील तुकाईनगर येथे ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न चर्चेत आला आहे.

‘शहरात गंभीर स्वरूपाच्या अपघातांमध्ये सहा महिन्यांत १४० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. बहुतांश अपघात अवजड वाहनांमुळे झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. अपघाती मृत्यूस जबाबदार अवजड वाहनांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, तसेच गेल्या पाच वर्षांत अपघातास जबाबदार ठरलेल्या अवजड वाहनांची माहिती गोळा करून ती वाहने जप्त करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अवजड वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू आहे. बंदी आदेश धुडकावून शहरात येणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध कारवाई करणयात येत आहे. यामध्ये परवाना रद्द करणे, वाहन जप्त करणे, तसेच न्यायालयीन कारवाईचा समावेश आहे. अपघाती मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अवजड वाहनांची माहिती घेऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे.

अवजड वाहनांना ३१ रस्त्यांवर बंदी

गंभीर अपघात, तसेच कोंडी सोडविण्यासाठी शहरात येणाऱ्या जड वाहनांना, तसेच मल्टिॲक्सल वाहनांना शहरातील सर्व मार्गांवर २४ तास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये १० पेक्षा जास्तचाकी वाहने, कंटेनर, ट्रेलर अशा वाहनांचा समावेश आहे. सहा ते दहा चाकी ट्रक, टेम्पो अशा वाहनांना रेड झोन केलेले मार्ग वगळून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. या आदेशातून मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्ग वगळण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश धुडकाविणाऱ्या अवजड वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अपघात प्रकरणात वाहन मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३० ते ३२ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, दंडात्मक कारवाईही केली आहे.- मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अवजड वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही कारवाई केली जाईल. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त