पुणे : कोकण विभाग वगळता राज्यात इतर ठिकाणी प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात जून अखेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. विदर्भात काही प्रमाणात पाऊस राहणार असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी (२५ जून) कोकण विभागात मुंबई आणि परिसरासह बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या कोकण विभागातच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या विभागात ३० जूनपर्यंत बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस मध्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात जून अखेपर्यंत तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या झारखंड आणि पसिरावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या भागासह छत्तीसगड, ओडिसा, पूर्व मध्य प्रदेश आदी भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचाच काहीसा परिणाम महाराष्ट्रातील विदर्भात दिसतो आहे. २६ जूनला विदर्भात काही ठिकाणी मुसळधारांची शक्यता आहे. पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडय़ातही पावसाची स्थिती मध्य महाराष्ट्राप्रमाणेच राहणार आहे.

शुक्रवारी कोकण विभागातील मुंबईत संध्याकाळी साडेपाचपर्यंत ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरांसह अलिबाग, रत्नागिरी आदी भागांत पाऊस झाला. मराठवाडय़ातील औरंगाबाद आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्य़ांत तुरळक पाऊस नोंदविला गेला.

गेल्या चोवीस तासांत कोकण विभागातील कणकवलीत ११० मिलिमीटर, तर मालवणमध्ये १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोसमी पाऊस राजस्थानात अडकला

देशव्यापी होण्यासाठी आठवडय़ापूर्वी वेगाने प्रवास करणारा मोसमी पाऊस सध्या राजस्थानात आणि जवळील राज्यांतच अडकला आहे. मोसमी पावसाने १९ जूनला देशाचा सुमारे ९० टक्के प्रदेश व्यापून दिल्ली, राजस्थान, पंजाब, चंडिगड, उत्तर प्रदेशातील बहुतांश भागांत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर पोषक वातावरण नसल्याने सात दिवसांपासून याच भागात तो थांबला आहे. या भागात सध्या मोठय़ा पावसाचा कोणताही अंदाज नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light rain till end of june in central maharashtra and marathwada zws
First published on: 26-06-2021 at 00:26 IST