पुणे : कृत्रिम प्रज्ञेकडे (एआय) हा केवळ आता परवलीचा शब्द राहिला नाही. पुण्यातील लघु व मध्यम उद्योगांचा कलही एआयकडे वाढू लागला आहे. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील दहापैकी नऊ कंपन्यांनी एआयमध्ये गुंतवणूक केली आहे अथवा ते एआयचा स्वीकार करण्याचे नियोजन करीत आहेत, असे लिंक्डइनच्या संशोधनातून समोर आले आहे.

एआयचा वापर करण्यात पुण्यातील लघु व मध्यम उद्योग आघाडीवर असल्याचे लिंक्डइनच्या संशोधनातून उघड झाले आहे. या संशोधनानुसार, पुण्यातील लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील ९२ टक्के कंपन्यांचा एआयकडे कल आहे. यातील काही कंपन्यांनी प्रत्यक्ष एआयमध्ये गुंतवणूक केली आहे, तर काहींकडून या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. लघु व मध्यम कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी ९१ टक्के जण पुढील १२ महिन्यांत व्यवसाय विस्ताराबाबत सकारात्मक आहेत. अधिक स्मार्ट यंत्रणा, कुशल मनुष्यबळ आणि डिजिटल स्थित्यंतर या गोष्टींना त्यांच्याकडून महत्त्व दिले जात आहे.

पुण्यातील लघु व मध्यम उद्योगांपैकी ६० टक्के उद्योगांनी कार्यक्षमता वाढीसाठी एआय आणि ऑटोमेशनचा स्वीकार करण्यास प्राधान्य दिले आहे. याच वेळी ४९ टक्के उद्योग हे डिजिटल स्थित्यंतरावर लक्ष केंद्रित करीत आहेत. विशेष म्हणजे कंपन्या विपणन आणि विक्रीसाठीही एआयचा स्वीकार करीत आहेत. विपणनासाठी एआय आधारित डिजिटल साधनांचा वापर करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण ७८ टक्के आहे. त्यातही विपणनाच्या एकूण खर्चापैकी निम्मी गुंतवणूक एआयमध्ये करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण ९६ टक्के आहे. याचबरोबर विक्रीसाठी एआयवर अवलंबित्व वाढू लागले असून, अशा कंपन्यांचे प्रमाण ७८ टक्के आहे. बहुतांश सर्वच कंपन्या ऑटोमेशन, विश्लेषण आणि व्यवसाय गुणवत्ता यासाठी एआयचा वापर करीत आहेत, असे संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

नोकरीसाठीही एआयचा निकष

लघु व मध्यम उद्योगांकडून नोकरी देताना उमेदवारांची डिजिटल साक्षरता आणि एआयचा प्रभावी वापर ही कौशल्ये महत्त्वाची ठरत आहेत. जवळपास ६७ टक्के कंपन्यांकडून हे निकष लावले जात आहेत. याचबरोबर समस्या सोडविणे आणि डिजिटल संवाद या कौशल्यांना अनुक्रमे ६३ व ५० टक्के कंपन्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. तसेच, ६३ टक्के कंपन्या एआय आधारित साधनांचा वापर उमेदवारांचे मूल्यमापन आणि भरती करण्यासाठी करीत आहेत, असेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

संशोधन कशा पद्धतीने?

लिंक्डइनने देशभरात १ हजार २७ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले. त्यात उद्योगांचे मालक, स्वयंउद्योजक, संचालक, वरिष्ठ व्यवस्थापक यांच्याकडून माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणातील सहभागींचे वय २५ ते ६५ वर्षे होते. हे सर्वेक्षण दिल्ली, जयपूर, चंडिगड, मुंबई, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता या १० शहरांमध्ये करण्यात आले.