पर्यटकांचे एक आकर्षण असलेल्या लोणावळा शहरालगतचा ‘लायन्स पॉईट’ हा काही दिवसांपासून बेकायदेशीर धंद्यांचा अड्डा बनला असून, येथील घटनांकडे पोलीस प्रशासन ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा करत असल्याचा आरोप या भागातील स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
लोणावळ्याच्या भुशी धरणानंतर लायन्स पॉईंट हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. हिरवागार निसर्ग, डोंगरांवरून वाहात येणारे धबधबे, कोकणच्या निसर्गाचे होणारे दर्शन आणि शांत परिसर याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांत लोणावळा परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी दहशत निर्माण करून तेथे अवैध धंदे सुरू केले आहेत. या ठिकाणी सर्रास दारू, हुक्का यांची विक्री केली जाते. तसेच, चरस, गांजा, कोकेन, म्याव-म्याव यांच्यासह विविध अमली पदार्थाची येथे विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही स्थानिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे गुंडांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले.
लोणावळ्याच्या जयचंद चौकात दोनच दिवसांपूर्वी एका युवकावर गुंडांकडून खुनी हल्ला झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुंडांनी अनेकांवर हल्ले करणे, धमकावणे, लुटणे, गाडय़ा पेटवून देणे असे प्रकार केले आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याने गुन्ह्य़ांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहराबाहेर घडणाऱ्या या घटना आता मध्यवर्ती भागापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

लायन्स पॉईटचा परिसर नाईट लाईफसाठी प्रसिध्द आहे. मुंबई, पुणे येथील तसेच परिसरातील महाविद्यालयांमधील युवक-युवती रात्र जागविण्यासाठी सर्रासपणे येथे येतात. या ठिकाणी अनेक अश्लिल प्रकार येथे खुलेआम घडतात, असे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. हे युवक-युवती उच्चभ्रू घरातील असल्याने पोलीसदेखील त्यांच्याकडे कानाडोळा करतात. लोणावळा ठाण्याच्या पोलिसांनी वर्षांपूर्वी मध्यरात्री येथे कारवाई करून नशा करणाऱ्या काही युवक-युवतींवर कारवाई केली होती. मात्र, अशा कारवाईत सातत्य नसल्याने दिसून आले.