महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांनी भेट देण्यासाठी देशभरातील शंभर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. करोनाचे निर्बंध संपूर्णपणे उठवण्यात आल्यानंतर संबंधित ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करण्याबाबत यूजीसीने स्पष्ट केले आहे.

यूजीसीकडून देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याबाबत नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने उपक्रम राबवण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सुचवलेल्या देशभरातील शंभर पर्यटनस्थळांची यादी यूजीसीने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

उच्च शिक्षण संस्थांनी एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाअंतर्गत देशाची विविधता आणि समृद्ध संस्कृती समजण्यासाठी विद्यार्थ्यांना या यादीतील ठिकाणी भेट देण्यासाठी पाठवायचे आहे. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी संबंधित ठिकाणांचा इतिहास, वैज्ञानिक योगदान, परंपरा आदी अभ्यासणे अपेक्षित असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. करोनाचे निर्बंध संपूर्णपणे उठवण्यात आल्यावर उच्च शिक्षण संस्थांनी संबंधित ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्याबाबत यूजीसीने स्पष्ट के ले आहे. यूजीसीने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या यादीत राज्यातील पाच ठिकाणे समाविष्ट आहेत. त्यात अजिंठा, वेरुळ, कान्हेरी, दौलताबाद किल्ला व महाबळेश्वर या ठिकाणांचा समावेश आहे.