scorecardresearch

तेंडुलकरांनी दिलेल्या रंग-कुंचल्यांनीच ‘तिने’ वाहिली श्रद्धांजली

तो क्षण मी जीवनात कधीच विसरणार नाही.

तेंडुलकरांनी दिलेल्या रंग-कुंचल्यांनीच ‘तिने’ वाहिली श्रद्धांजली

व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी सुखसागर येथील शाळेच्या गणवेशामध्ये आलेल्या आठवीत शिकणाऱ्या पूर्वा गवळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंगेश तेंडुलकरांच्या प्रोत्साहनामुळे तिने आजवर दहा चित्र प्रदर्शने भरवली आहेत. मागील महिन्यातच तेंडुलकर यांनी पूर्वाला त्यांच्याकडील रंग आणि कुंचले (ब्रश) देऊन कलेत अधिक झोकून देण्यासाठी आशीर्वाद दिले होते. आता मला काम होत नाही, हे ब्रश घे! यातून तुझी कला बहरत ठेव. असा आशीर्वाद तेंडुलकरांनी पूर्वाला दिला होता.

पुण्यातील सुखसागर भागात राहणारी पूर्वा गवळी हिने वयाच्या चौथ्या वर्षी बालगंधर्व कलादालनात चित्र प्रदर्शन भरविले होते. या घटनेला  तब्ब्ल १० वर्षांचा काळ लोटला. या पहिल्या चित्र प्रदर्शनाला ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी हजेरी लावून पूर्वाचे कौतुक केले. त्यानंतर पूर्वाने आतापर्यंत १० चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रत्येक प्रदर्शनाला मंगेश तेंडुलकर यांनी हजेरी लावून तिला प्रोत्साहन देण्याचे काम केले. मात्र त्यांच्या निधनानंतर पूर्वाच्या काळजाचा ठोका चुकला. मंगेश तेंडुलकर यांना ती आजोबा अशी हाक मारायची. आजोबाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पूर्वा आई वडिलांसोबत   वैकुंठ स्मशानभूमीत आली होती.

त्यांच्या आठवणी सांगताना ती म्हणाली की, मी वयाच्या पाचव्या वर्षी चित्र प्रदर्शन भरवले त्यावेळी तेंडुलकर आजोबांनी चित्र प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यावेळी मला त्यांच्या विषयी अधिक माहिती नव्हती. आई- आजोबांनी सांगितले की ते खूप मोठे व्यंगचित्रकार आहेत. त्यानंतर अनेकदा त्यांच्याशी बोलणे झाले. यातून माझ्यातील कलेला उर्जा मिळाली. आज माझे गुरु या जगात नाहीत याचे खूप दुःख होत आहे. मात्र त्यांनी महिन्यापूर्वी घरी बोलवून त्यांनी ज्या व्यंगचित्रातून समाज प्रबोधन केले. ते रंग आणि कुंचले भेट दिले. मला काम होत नाही, या ब्रश मधून तुझी कला बहरत राहो. असे सांगत त्यांनी माझ्या चेहऱ्यावरुन हात फिरवला. तो क्षण मी जीवनात कधीच विसरणार नाही. याच रंग आणि कुंचल्याच्या साहाय्याने पूर्वाने तेंडुलकरांचे चित्र रेखाटून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-07-2017 at 20:18 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या