रेल्वेच्या पुणे-लोणावळा मार्गावर ओव्हरहेड वीज वाहिन्यांची क्षमता वाढविल्यानंतर लोकलचा वेग वाढून आणखी नव्या लोकल सुरू होतील, ही प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकलची संख्या व फेऱ्या वाढवायच्या असतील, तर या मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा हवी आहे. मात्र, ही यंत्रणा उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च लागणार असल्याने त्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केले असून, लोकल सेवेच्या विस्ताराला त्यामुळे ब्रेक लागला आहे.
पुणे-लोणावळादरम्यान प्रवाशांना सेवा देण्यासाठी सध्या चार लोकल आहेत. या लोकल दिवसभरात ४४ फेऱ्या करतात. त्याचा लाभ दररोज सुमारे लाखभर प्रवासी घेतात. विद्यार्थी, छोटे व्यापारी, कामगार यांच्याकडून या सेवेचा प्रामुख्याने लाभ घेतला जातो. कमी खर्चात प्रवास होत असल्याने लोकलच्या सेवेला अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. प्रवाशांची वाढती संख्या व त्यामुळे डब्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नऊ डब्यांची लोकल काही वर्षांपूर्वी बारा डब्यांची करण्याची करण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच तळेगाव-लोणावळ्यापर्यंतच्या भागाचा होणारा विस्तार लक्षात घेता, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आणखी लोकल पुण्यासाठी द्यावी व उपलब्ध लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवासी अनेक दिवसांपासून करीत आहेत.
पुणे-लोणावळा मार्गावर लोकल किंवा त्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी गाडय़ांचा वेग वाढविणे गरजेचे होते. त्या दृष्टीने या रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वीजवाहिन्या डायरेक्ट करंटऐवजी (डीसी) आता अल्टरनेट करंटवर (एसी) परावर्तित करण्यात आल्या. त्यानंतर लोकल ताशी १०० किलोमीटर वेगाने सोडण्याचे प्रयत्न झाले. पण, काही दिवसांतच लोकलचा वेग पुन्हा कमी करण्यात आला. त्याचे एकमेव कारण म्हणजे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा अभाव.
मुंबईमध्ये एकापाठोपाठ एक लोकल सोडल्या जातात. हे केवळ स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळेच शक्य होते. पुणे-लोणावळा मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढविणे केवळ याच यंत्रणेमुळे शक्य होणार आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता याबाबत रेल्वेकडून विशेष प्रयत्न होत नाहीत, असे दिसते आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यातही मोठय़ा प्रमाणावर लोकल सेवा सुरू होण्यास दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका किलोमीटरसाठी पाच कोटी खर्च
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी नुकतीच पुणे रेल्वे स्थानकाला भेट दिली. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल सेवेच्या विस्ताराबाबत विचारण्यात आले होते. त्या वेळी त्यांनीही स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा अभाव असल्याचे स्पष्ट केले. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी एका किलोमीटरला पाच कोटी रुपये खर्च असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे खर्चाच्या प्रश्नावर या विषय मागे टाकण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.