करोना प्रादुर्भावामुळे नाट्यगृहांच्या उत्पन्नाची टाळेबंदी

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्चच्या मध्यापासूनच नाट्यगृहांतील प्रेक्षकांची संख्या कमी होऊ लागली होती.

१६ महिन्यांपैकी वर्षभर नाट्यगृहे बंद; भाड्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे अपेक्षित उद्दिष्टही असाध्य

पुणे : करोना प्रादुर्भावामुळे शहरातील नाट्यगृहांच्या उत्पन्नाची टाळेबंदी झाली आहे. गेल्या १६ महिन्यांपैकी वर्षभर नाट्यगृहे बंद असल्यामुळे महापालिकेच्या नाट्यगृहांकडून भाड्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता आले नाही. सर्व नाट्यगृहांचे मिळून पाच कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मार्चअखेरीपर्यंत ४४ लाख ५४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्चच्या मध्यापासूनच नाट्यगृहांतील प्रेक्षकांची संख्या कमी होऊ लागली होती. करोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने टाळेबंदी लागू केली. त्यामध्ये अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मॉल, जलतरण तलाव, केशकर्तनालये या सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या.

त्याचा परिणाम शहरातील नाट्यगृहांच्या उत्पन्नावर झाला. नाट्यगृहातील प्रयोगांच्या भाडे आकारणीनुसार पाच कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, नाट्यगृहे बंद असल्यामुळे उत्पन्नाची टाळेबंदी झाली असल्याची माहिती नाट्यगृहाचे मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनी दिली.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने ५० टक्के प्रेक्षक क्षमतेमध्ये नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष नाट्यगृहे सुरू होण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. नाटकांच्या प्रेक्षक संख्येत घट झाली. प्रशांत दामले यांच्या एका नाट्यप्रयोगाला बाल्कनी उघडावी लागली होती.

तर, लावण्यांच्या कार्यक्रमांना जेमतेम पन्नास प्रेक्षक असायचे. करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे एक मार्चपासून पुन्हा नाट्यगृहे बंद ठेवण्याचे आदेश आले. तेव्हापासून नाट्यगृहांच्या उत्पन्नाला खीळ बसली आहे, याकडे मते यांनी लक्ष वेधले.

करोना प्रादुर्भावामुळे शहरातील नाट्यगृहे बंद असल्याचा फटका उत्पन्नाला बसला आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नाटकांचे मोजकेच प्रयोग झाले. तर गणेश कला क्रीडा मंच येथील भाडे तुलनेने अधिक असल्याने हे उत्पन्न झाल्याचे दिसत आहे.          –सुनील मते, मुख्य व्यवस्थापक, महापालिका रंगमंदिर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lockdown theatrical revenues due to corona virus infection outbreaks akp

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा