Lohagad Ketan Agarwal Death Case investigation Updates: पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी सिया गोयल हिने पोलिसांच्या चौकशीत विसंगत विधाने करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांनी दोघांचेही मोबाईल फोन जप्त केले असून, त्यातून समोर आलेल्या चॅट्समुळे सियाचा खोटेपणा उघडा पडला आहे. लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.
‘मला लग्नच करायचं नव्हतं’; सियाचा पोलिसांसमोर नवा दावा
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सिया गोयल आता चौकशीदरम्यान नवीन कथा सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. सियाने पोलिसांना सांगितले की, “मला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि मी त्याला तसे स्पष्ट केले होते.” ती पुढे म्हणाली की, “जेव्हा मी लग्नास नकार दिला, तेव्हा केतन मला म्हणायचा की, आता खूप उशीर झाला आहे, गोष्टी खूप पुढे निघून गेल्या आहेत आणि आता यात काहीही बदल होऊ शकत नाही.”
मोबाईलमधील संभाषण सियाच्या दाव्यांच्या पूर्णपणे उलट
पोलीस तपासात सियाने केलेले दावे आणि दोघांच्या मोबाईलमधील चॅट्स यामध्ये मोठी तफावत आढळली आहे. त्यामुळे पोलिसांचा सियाच्या जबाबावर अजिबात विश्वास नाही. पोलिसांनी केतन आणि सिया या दोघांचेही मोबाईल फोन हस्तगत केले असून, त्यांच्यातील चॅट्स रिकव्हर करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलमधील संभाषण सियाच्या दाव्यांच्या पूर्णपणे उलट आहे. लग्नाआधी या दोघांमध्ये अत्यंत प्रेमळ संवाद सुरू होता आणि ते एका सामान्य जोडप्यासारखे एकमेकांशी बोलत होते, असे चॅट्सवरून स्पष्ट होते. त्यामुळे सियाने केलेले दावे पटणारे नाहीत, असे सांगत पोलीस आता सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा घटनाक्रम
- १८ जून: लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी तपासाअंती या प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले.
- २३ जून: लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना अटक केली.
- २९ जून: न्यायालयाने या दोघांनाही २९ जूनपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अग्रवाल कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
दरम्यान, या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पीडित अग्रवाल कुटुंबाने आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लोणावळा पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तांत्रिक पुरावे आणि फॉरेन्सिक रिपोर्टची मदत घेत असून, पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
